

पुणे : पुढारी वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना अडकवण्यााबाबत केलेल्या आरोपांनंतर त्याचे पुणे पोलिसांत पडसाद उमटले आहेत.
विरोधकांना अडकविण्यासाठी सरकारी वकिलांकडून कशा पद्धतीने योजना आखल्या जात असल्याचे व्हिडीओ विधानसभेत मंगळवारी (दि.8) फडणवीस यांनी सादर केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, ज्या गुन्ह्याच्या बाबतीत फडणवीसांनी हे आरोप केले तो गुन्हा पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे त्याचे पडसाद पुणे पोलिस आयुक्तालयात उमटले. बुधवारी गृहमंत्र्यांनी घटनेची माहिती घेण्यासाठी संबंधित गुन्ह्याच्या तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्तांना मुंबईत बोलावून घेतले. त्यांच्याकडून या गुन्ह्याची माहिती घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपचे नेते गिरीश महाजन व इतरांवर हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात महाजन यांना अडविण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात महाजन वगळता सर्वांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे. त्या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कोथरूडच्या गुन्ह्याच्या प्रकरणासंदर्भातील संभाषणाचे व्हिडीओ विधानसभेत सादर केले. त्यामध्ये पुण्यातील काही अधिकार्यांची नावे घेतली.
त्याच पार्श्वभूमीवर तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांना गृहमंत्र्यांनी मुंबईला बोलावून घेतले आणि गुन्ह्याची सविस्तर माहिती घेण्यात आल्याचे समजते.विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात आहे. त्यांच्या याच कार्यालयात छुप्या कॅमेर्याने हे व्हिडिओ शूटिंग केल्याची चर्चा आहे. पण शूटिंग कसे केले असावे याबद्दल पोलिस दलात दिवसभर चर्चा सुरू होती. यावरून विविध प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात होते.
जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईटे गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. आरोपींनी पाटील यांना पुण्यात संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसर्या एका व्यक्तीलाही त्यांनी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीआयडीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती, अशी तक्रार आहे. त्यानुसार गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, नीलेश भोईटे यांच्यासह एकूण 29 जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता.