लागलाय पोटाचा ठाव ; पडू शकतो अपघाताचा घाव

Children On Signals
Children On Signals

पिंपरी : राहुल हातोले : सिग्नलवर थांबलेला वाहन चालक सिग्नल सुटण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात वाहनाच्या काचांवर फाटफाट असा आवाज येतो.

गाडीच्या काचा पुसता पुसता, काच खाली घेण्याची विनंती करून, इशार्‍याने पोटावरून हात फिरवत, उपाशी असल्याचे सांगून एक लहान मुलगा पैसे मागत होता.

मात्र, तेवढ्यातच सिग्नल सुटतो, आणि मागच्या वाहनांचे हॉर्न वाजायला सुरू होतात. त्यामुळे वाहन पुढे घेण्याच्या गडबडीत काचा पुसणार्‍या त्या मुलाला वाहन चालकाच्या वाहनाचा मागच्या भागाचा धक्का लागतो आणि तो पडता पडता वाचतो.

धडपडत स्वतःला सावरतो. मागच्या चाकात त्याचा जीव जाता जाता वाचतो. मात्र, जर त्या मुलाचे काही बरे वाईट झाले, तर याला जबाबदार कोण?

पोटापाण्यासाठी ही मुले जीव धोक्यात घालून, वस्तूंची विक्री करताना वाहनांना सामोरे जातात. अशा वेळी चुकून अपघात झाला तर वाहन चालकास चौकशीला सामोरे जावे लागू शकते. मात्र, याकडे सध्या कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील निगडी, पिंपरी-चिंचवड, दापोडी व खंडोबामाळ आदी ठिकाणांवरील चौकाचौकांत अशी स्थलांतरित कुटुंब आपल्या लहान-लहान मुलांसह रस्त्यावर दिवसभर असतात.

रस्त्याच्या कडेला आई-वडील बसतात तर मुलं सिग्नल लागल्यावर पेन, पेन्सिल, प्लास्टिक बॅग व खेळणी विकण्यासाठी चौकात विखुरतात.

कुणी वाहनांच्या काचा पुसण्यासाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरतात. वाहन थांबले की, न सांगताच काचांवर पाणी टाकून, जबरदस्ती पैसे मागतात.

नागरिकांच्या भावनेचा गैरफायदा घेत, खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात लहान मुलांना रस्त्यावर पैशांसाठी उतरवून, त्यांचे पालक स्वतः मात्र बाजूला बसून, मुलांना मिळालेला पैसा गोळा करतात.

महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुशोभीकरण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. तर दुसरीकडे शहराच्या चौकाचौकात ठिय्या मांडून बसलेल्या स्थलांतरितांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे.

"बेवारस नागरिकांसाठी पिंपरी येथे सावली नावाने निवारा केंद्र सुरू केले आहे. ज्यांना घर नाही. त्यांची राहण्याची आणि भोजनाची सोय केली आहे. मात्र, चौकाचौकांतील हे नागरिक स्थलांतरित आहेत. बहुदा यांचा एका जागी ठिकाणा नसल्याने ते दर वेळेस आपली जागा बदलतात. त्यामुळे त्यांची नोंद ठेवणे शक्य होत नाही."
– अजय चारठाणकार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका, नागरवस्ती विभाग.

"धोकादायकरीत्या साहित्य विक्री करणार्‍या चिमुकल्यांच्या पाल्यांचे प्रबोधन तत्काळ करण्यात येईल. त्यासोबतच प्रबोधन केल्यानंतरदेखील पुन्हा अशी विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल."
– आनंद भोईटे, डीसीपी, वाहतूक विभाग.

https://youtu.be/FEtlxeG0ZyM

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news