पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची टंचाई समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. पुणे जिल्ह्यातदेखील औषधसाठ्याबाबत चर्चा सुरू होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पुढील दीड महिना पुरेल एवढाच औषधसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवली जात असून, त्यासाठी 108 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. त्यामध्ये नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा दिल्या जात असून, गंभीर रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालयामध्ये संदर्भीत केली जातात. दरम्यान, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आदी ठिकाणी औषधसाठा अपुरा असल्याने रुग्णांचे हाल झाल्याचे प्रकार समोर आला.
त्यानंतर ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा किती आहे, रुग्णांना वेळेवर उपचार मिळतात का, यावर चर्चा सुरू झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाचा आढावा घेतला त्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रांमध्ये दीड महिना औषधसाठा पुरेल अशी माहिती दिली. तसेच चालू आर्थिक वर्षामध्ये औषध खरेदीसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, खरेदीला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली असून, पुढील एक महिन्यात संपूर्ण खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे.
2023-24 वर्षामध्ये 8 कोटी रुपयांची औषध खरेदीची प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रिया सुरू असून, पुढील महिन्यामध्ये औषधसाठा मिळणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे औषधासाठी अजून महिनाभर वाट बघावी लागणार आहे.
हेही वाचा