

सांगली ः गुन्हेगार म्हटलं की शिक्षा ही आलीच आणि शिक्षा म्हटलं की तुरुंग आलाच. तुरुंग म्हटलं की डोळ्यासमोर येतं दगडी भिंतीआडचं बंदिस्त जीवघेणं जीवन. मात्र, सांगली जिल्ह्यात आटपाडीपासून तीन किलोमीटरवर स्वतंत्रपूर या खुल्या तुरुंगात कैद्यांना चार भिंतीआड नाही, तर मुक्तपणे एका वसाहतीमध्ये ठेवले जाते. गेली 83 वर्षे हा खुला तुरुंग सुरू आहे. तुरुंग कसा आहे, याची झलक चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांच्या 'दो आँखे बारह हाथ' या चित्रपटात पाहायला मिळते. (Sangli News)
शिक्षा भोगत असताना अनेक कैद्यांना दु:वर्तनाची जाणीव होत असते. सामान्य आयुष्य जगण्याची ओढ लागते. याचाच परिणाम म्हणजे त्यांचं वर्तन सुधारतं. अशा वर्तन सुधारलेल्या, मात्र शिक्षेची काही वर्षे शिल्लक असणार्या कैद्यांना त्यांच्या सद्वर्तनाचं बक्षीस म्हणून या तुरुंगात आणलं जातं. अर्थात रूढार्थानं हा तुरुंग नसून हे स्वतंत्रपूर नावाचं छोटसं गाव आहे. शेतजमिनीत समृद्ध असं हे गाव कैद्यांना माणसात आणत आहे.
कैदी इथं पक्क्या बांधलेल्या स्वतंत्र घरात राहतात. त्यांचं कुटुंबही त्यांना भेटू शकतं किंवा राहू शकतं. कैदी तेथील शेतात भाजीपाला पिकवितात. तो बाजारात विकून आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करतात.
1939 मध्ये हा तुरुंग बनला. त्याचे बांधकाम कैद्यांनीच केले. कैद्यांनी स्वत:चा तुरुंग बांधण्याचं हे इतिहासातील बहुतेक एकमेव उदाहरण असावं. या तुरुंगाची खासीयत म्हणजे, कैद्यांच्या हाता-पायात बेड्या नसल्या तरीही, ते इथून पळून जात नाहीत. सुरुवातीला एक जेलर व सहा कैद्यांना आणले होते. जेव्हा तुरुंग बनला, तेव्हा इथं ओसाड माळरान होतं. गुन्हेगारांना मोकाट सोडण्याचा धाडसी प्रयोग येथे प्रथमच केला. तो यशस्वीही झाला. गेली 83 वर्षे या तुरुंगात कैद्यांना मुक्त सोडलं जातं. (Sangli News)
'दो आँखे बारह हाथ' चित्रपटातील 'ऐ मालिक तेरे बंदे हम…' हे गाणे खूप गाजले. या गाण्यानं सर्वांना ऊर्जा व प्रेरणा मिळत असल्याने राज्यातील बहुतांश कारागृहात सकाळी प्रार्थनेवेळी ते गायिले जाते. कैद्यांनी चांगले वर्तन करावे, यादृष्टीने हे गाणे प्रभावी आहे.
28 कैदी ठेवण्याची क्षमता या तुरुंगाची आहे. सध्या सोलापूर, पुणे, जळगाव व रायगड येथील चार कैदी येथे कुटुंबासह राहून शिक्षा भोगत आहेत. त्यांनी मकाशेती केली आहे. तसेच कुक्कुटपालन प्रकल्पही राबविला आहे. साधारणपणे शंभरहून अधिक कोंबड्या आहेत. यामधून मिळणार्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. 60 शेळ्याही पाळल्या आहेत.
दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो आँखे बारह हाथ' या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले. चित्रपटातील काही द़ृश्ये याच तुरुंगात चित्रीत केली आहेत.
1954 मध्ये नामदेव आणि येडा असे दोन कैदी पळून गेले; पण पंधरा दिवसातच ते स्वत:हून तुरुंगात परतले. आम्ही कुठेही गेलो तरी, तुरुंग अधीक्षकांचे दोन डोळे आमचा पाठलाग करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही गोष्ट ग. दि. माडगूळकर यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती व्ही. शांताराम यांना दिली व चित्रपटाची निर्मिती झाली. (Sangli News)