Sahyadri Express : सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच धावणार; मुंबई-पुणे-कोल्हापूरकारांना दिलासा | पुढारी

Sahyadri Express : सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच धावणार; मुंबई-पुणे-कोल्हापूरकारांना दिलासा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात बंद झालेली मुंबई-पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. या गाडी संदर्भातील प्रस्ताव मध्य रेल्वेने आता रेल्वे बोर्डाला पाठवला असून, लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांनी शनिवारी (दि. १४) व्यक्त केला. पुण्यात झालेल्या खासदारांच्या बैठकीत मुंबई-पुणे व सोलापूर विभागातील खासदारांनी ही गाडी सुरू करण्यासंदर्भात मागणी केली.

शनिवारी झालेल्या बैठकीत पुणे व सोलापूर विभागातील नऊ खासदारांसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील, पुण्यातील खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, लातूरचे खासदार सुधाकर श्रंगारे, माढाचे खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकर, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे व पुणे, सोलापूर विभागातील रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी लाईन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. पुणे-लोणावळा लोकल ट्रेनच्या सेवेत वाढ करावी, दौंडपर्यंत या सेवांचा विस्तार करणे, लोणावळा-दौंड विभागात ईएमयू रेक देखभाल डेपो तयार करणे, लोणावळ्याजवळ गुड्स शेड करावी, जी मळवली व तळेगाव येथे प्रस्तावित आहे त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशा मागण्याही या वेळी केल्या.

– खा. वंदना चव्हाण

पुणे लोणावळा लोकल गाड्या दुपारच्या वेळेत बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, कामगारांना मोठ्या अडचणी येत आहेत. या लोकल दुपारच्या सुमारासही सुरू करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. वडगाव-केशवनगरच्या पुलाचे रखडलेले काम सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. सिंहगड एक्स्प्रेसला दोन नवे डबे जोडावेत, अशी मागणीही केली आहे. प्रशासनाने सिंहगड एक्स्प्रेसला महिलांसाठी एक डबा जोडणार असल्याचे या वेळी सांगितले.

– खा. श्रीरंग बारणे, मावळ.

आरओबी/आरयूबीची बांधकामे, अमृत भारत स्थानकाच्या विकासकामांची प्रगती, ट्रॅक दुहेरीकरणाचे काम, रुळांच्या बाजूने वृक्षारोपण, पुणे-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम या संदर्भात चर्चा झाली. ट्रेन थांबवण्याच्या विविध समस्या या वेळी मांडल्या.

– खा. श्रीनिवास पाटील, सातारा.

हेही वाचा

Mumbai-Pune highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीत बदल

Pune News : आजारी असतानाही पर्यावरणाचाच ध्यास; डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केली तळमळ

Ajit Pawar : अजित पवारांकडून कारवाईचा बडगा नाहीच

Back to top button