Pune News : राज्य कामगार विमा योजनेत ‘प्रतिनियुक्तीचा खेळ’!

Pune News : राज्य कामगार विमा योजनेत ‘प्रतिनियुक्तीचा खेळ’!

पुणे : राज्य कामगार विमा योजनेत मे अखेरीस लिपिक, परिचारिका व समवैद्यकीय संवर्गातील जवळपास 342 कर्मचारी, अधिकार्‍यांच्या जम्बो बदल्या झाल्या. बदली आदेश प्राप्त होताच अनेकांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. मात्र तीन महिन्यातच जवळपास निम्मे कर्मचारी उसनवारी तत्त्वावर सेवा (प्रतिनियुक्ती) आदेश घेऊन आधीच्या ठिकाणी पुन्हा रुजू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मूळ जागी परतण्यासाठीच प्रतिनियुक्तीची ही पळवाट शोधली असून यात कोट्यवधींची 'लेनदेन' झाल्याची चर्चा आहे.

कर्मचार्‍यांना मूळ ठिकाणी परत आणायचे होते तर मग जम्बो बदल्यांचा खेळ कशासाठी केला, असा सवालही उपस्थित होत आहे.
अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी तीन वर्षे झाल्यानंतरही खुर्चीला चिकटून होते. त्यांची मनमानी वाढली होती. त्यामुळे प्रशासनाने 9 एप्रिल 2018 च्या समुदेशन धोरणाची सहा वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच अंमलबजावणी केली. त्यानुसार मे महिन्याच्या अखेरीस परिसेविका, वरिष्ठ सहायक, कार्यालय अधीक्षकांसह विविध पदांवरील 342 कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या.

तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांच्या मान्यतेने व संचालक (प्रशासन) महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने झालेल्या बदल्या या योजनेच्या इतिहासातील जम्बो बदल्या ठरल्या. त्यामुळे नागपूर रुग्णालयातील कर्मचारी मुंबईत, मुंबईतील कर्मचारी नागपुरात, सोलापूरचे कर्मचारी मुंबईत, मुंबईचे सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, तर औरंगाबादचे नाशिक, नागपूर, सोलापूर मुंबई व इतरत्र पाठवण्यात आले. एकाच ठिकाणी 10 ते 15 वर्षापासून ठाण मांडून बसलेल्यांना ही मोठी चपराक होती.

त्यातच आयुक्त करंजकर यांची बदली झाली. डॉ. मिलिंद शंभरकर यांच्याकडे कामगार विमा योजनेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. परंतु ते या योजनेत न रमल्याने प्रशासकीय कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला. याच दरम्यान विद्यमान संचालक (प्रशासन) महेश वरुडकर यांनी थेट आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आणि चित्र उलटे झाले. मे अखेर बदल्या झालेल्या लिपिक, परिचारिका व समवैद्यकीय संवर्गातील निम्म्याहून अधिक कर्मचार्‍यांनी सेटिंग लावत मूळ जागी प्रतिनियुक्ती मिळवली आहे आणि ते पुन्हा पहिल्या जागी रुजू झाले आहेत. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी आयुक्त वरूडकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आयुक्तालयात वरिष्ठ सहायक ठरला 'हिरो'

कामगार विमा योजनेच्या आयुक्तालयाच्या मुंबई कार्यालयातील एक वरिष्ठ सहायक कर्मचारी जंबो बदली प्रकरण, उसनवारी तत्वावर सेवा वर्ग करण्यासाठी 'अर्थ' व्यवहारात मुख्य भूमिका बजावत असल्याची चर्चा आहे. तो तत्कालीन आरोग्यमंत्र्यांचा विशेष अधिकारी देखील राहिलेला आहे. आता तो अतिवरिष्ठ अधिकार्‍यांचा उजवा हात असून तो सर्व सेटिंग करत असल्याचे कर्मचारी सांगतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news