

जळोची : एसटी कर्मचारी व संघटना यांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांना निवेदन देऊन व्यथा मांडल्या. शासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आता होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 55 टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, हा वाढीव भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून थकीत रकमेचा तातडीने लाभ देण्यात यावा, सन 2016 ते 2020 या कालावधीतील वेतनवाढीत मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्याचेही संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे. घरभाडे भत्त्याचा दर 8, 16, 24 टक्के असताना तो 7, 14, 21 टक्के करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नोव्हेंबर 2021 पासून सुधारित दर लागू झाले असले तरी एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 तसेच 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील थकबाकी अद्यापही प्रलंबित असून, ती तत्काळ अदा करण्यात यावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर त्यांच्या घरभाडे भत्त्यात 10, 20 व 30 टक्के वाढ करण्यात आली.
हीच सवलत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, महामंडळातील चालक व वाहकपदावर कार्यरत असलेले सुमारे 5 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी अनेक वर्षांपासून हंगामी वेतनश्रेणीवर काम करत आहेत. वाहक पदाची 3 हजार 730 पदे आजही रिक्त असून चालक, वाहक व चालक-तथा-वाहक ही पदे एकत्रित मंजूर करून या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीत सामावून घेण्यात यावे, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे घरबांधणी अग््राीम शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी असून त्यावरील व्याजदर देखील अधिक आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अग््राीम रक्कम वाढवून व्याजदर कमी करावा, राज्यातील अनेक एसटी आगारांतील चालक, वाहक व कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहे आज जीर्णावस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती व आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाने खास बाब म्हणून स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, शासनाकडून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होतो का, याकडे राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एसटी कर्मचारी यांना नेहमी दुर्लक्षित केले जाते. विविध आंदोलने यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांना निवेदन देत एसटी कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत काय उपाययोजना केल्या, याची सभागृहात माहिती द्या, अशीही मागणी केली आहे. -
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य