

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या पदार्थांमधून विषबाधा होऊ नये अथवा भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेदरम्यान आढळणार्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन 'एफडीए'तर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अधिकार्यांनी तपासणी व खाद्य नमुने संकलित करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, कच्चे अन्नपदार्थ व खवा परवानाधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा, विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत नोंदणी क्रमांक नमूद करावा, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विक्रेत्यांनी कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा वापर करावा, बंगाली मिठाई 8-10 तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरिअलवर निर्देश देण्यात यावेत, माश्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे, असेही आदेश दिल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त सु. गं. अन्नपुरे यांनी कळविले आहे.
हेही वाचा