अस्खलित हिंदी बोलणार्‍या अमेरिकन प्रवक्त्या | पुढारी

अस्खलित हिंदी बोलणार्‍या अमेरिकन प्रवक्त्या

नवी दिल्ली : भारतात 9 आणि 10 सप्टेंबरला झालेल्या ‘जी-20’ समूहाच्या शिखर परिषदेने अनेक बाबतील लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये सध्या भारतात अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या मार्गारेट मॅक्लाऊड यांचा समावेश आहे. ‘जी-20’ शिखर परिषदेवेळी त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला अस्खलित हिंदीमधून मुलाखत दिली व त्यांचे हिंदीवरील प्रभुत्व पाहून लोक थक्क झाले.

भारत आणि अमेरिका संबंध तसेच ‘जी-20’ शिखर परिषदेबाबत त्यांनी यावेळी अनेक प्रकारच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. ही सर्व उत्तरे एखादा हिंदी भाषिक माणूस ज्या सहजतेने बोलेल तितक्याच सहजतेने त्यांनी हिंदीतून दिली. आता त्यांचा हिंदी दिवसांच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये त्यांनी हिंदीमध्ये बोलत असताना सर्व भारतीय व जगातील सर्व हिंदी बोलणार्‍या लोकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना चौदा वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यांना इंग्रजीशिवाय हिंदी, उर्दू, गुजराती, फ्रेंच आणि जपानी भाषाही बोलता येते. त्या दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये राहायच्या. तिथेच त्या हिंदी बोलण्यास शिकल्या. त्यांनी दिल्लीच्या ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेतले आहे.

Back to top button