माऊलींच्या पालखी रथासाठी सोन्या-माऊलीची जोडी

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासाठी फुरसुंगीतील खुटवड कुटुंबीयांच्या सोन्या-माऊली या बैलजोडीला मान.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासाठी फुरसुंगीतील खुटवड कुटुंबीयांच्या सोन्या-माऊली या बैलजोडीला मान.

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा

'संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी रथ ओढण्यासाठी (सारथ्य) फुरसुंगी येथील खुटवड कुटुंबाच्या सोन्या व माऊली या बैलजोडीला मान मिळाला आहे. गुरुवार, दि.2 जून रोजी या बैलजोडीचे विधिवत पूजन करून देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची' माहिती आप्पा खुटवड यांनी दिली.

पालखी रथास बैलजोडी देण्याचा पारंपरिक मान कुर्‍हाडे, वरकडे, गुंडरे, रानवडे व वहिले या पाचपैकी एका कुटुंबाला दिला जातो. यावर्षी हा मान पांडुरंग वरकडे यांना मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून खुटवड कुटुंबीयांची ही बैलजोडी पालखी रथास जुंपली जाणार आहे. आषाढी वारीनिमित्त आळंदी ते पंढरपूर व परतीच्या प्रवासात पंढरपूर ते आळंदी या प्रवासात ही बैलजोडी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य करणार आहे.

दरवर्षी दिवे घाटात खुटवड कुटुंबीयांच्या बैलजोडीला रथाचे सारथ्य करण्याचा मान मिळतो. मात्र, यंदा संपूर्ण यात्रेचे सारथ्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल खुटवड कुटुंबीय व फुरसुंगी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पालखी रथाचे सारथ्य करण्यास सक्षम बैलजोड निवडताना विविध निकषांद्वारा त्यांचे परीक्षण केले जाते. या परीक्षणामध्ये बैलांचे आरोग्य, वय, शिंगे, रंग, शेपटी, खूर, उंची, शुभ्रता व त्यांची काम करण्याची क्षमता या निकषांची पाहणी केली जाते. हे सर्व निकष सोन्या व माऊली या बैलजोडीने पूर्ण केले आहेत. या निमित्ताने सोन्या-माऊलीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सोन्या-माऊली बैलांची उंची 6 फूट, वय 5 वर्षे, पांढरा शुभ्र रंग व टोकदार शिंगे आहेत. पुन्हा पाच वर्षांनंतर माऊलींची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. याबद्दल आम्ही वरकडे कुटुंबीय, देवस्थान समिती, वारकरी बांधव व भाविकांचे आभार मानतो.

                                      – आप्पा खुटवड, प्रगतशील शेतकरी, फुरसुंगी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news