

नगर : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मोबाईलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नगर मोबाईल सेल व नगर तालुका पोलिसांनी चिचोंडी पाटील येथून एकाला अटक केली आहे.
भाऊसाहेब नारायण शिंदे (वय 40 मूळ रा. भेंडा ता. नेवासे, हल्ली रा. चिचोंडी पाटील) असे त्याचे नाव आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना मोबाईलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, आरोपी नगर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. अहमदनगर मोबाईल सेल व नगर तालुका पोलिसांनी आरोपीचा शोध घेत आज सकाळी चिचोंडी पाटील येथून भाऊसाहेब शिंदे याला ताब्यात घेतले. त्याला पुणे क्राईम ब्रंच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी भाऊसाहेब शिंदे याच्याकडे चौकशी केली असता सॅटेलाईटद्वारे माझ्या कुटुंबावर नियंत्रण मिळविण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. यामध्ये माझ्या पत्नीवर अन्याय झाला आहे. तिला न्याय मिळत नाही म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना फोन द्वारे धमकी दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली, अशी माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.
दरम्यान, आरोपी भाऊसाहेब शिंदे यांची मानसिक स्थिती बरोबर नसून तो पूर्वी मुंबई येथे नोकरी करत होता तिथून नोकरी सोडून तो आता गावाकडे राहत आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.