

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेवरील भाडेकरूंचे कारखानाहिताच्या विरोधात वर्तन होत असल्याने कारखाना व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून कारखाना आणि स्थानिक व्यावसायिकांत वारंवार बैठका होत आहेत. मात्र, यावर तोडगा निघाला नाही. कारखान्याने सहकार्याची भावना ठेवून पुनर्वसनाचा प्रस्ताव दिल्यानंतरही व्यावसायिकांनी तो मान्य करण्यास नकार दिला आहे.(Latest Pune News)
कारखान्याच्या स्थापनेपासूनच परगावाहून आलेल्या तसेच काही स्थानिकांना व्यवसायासाठी कारखाना परिसरात भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. सुरुवातीला कारखाना लहान असल्याने जागा देण्यामागे त्यांना आर्थिक आधार देण्याचा हेतू होता. अनेकांनी या जागांवर टपऱ्या, शेड्स उभारून व्यवसाय सुरू केला. कालांतराने हे व्यवसाय वाढले आणि अनेक भाडेकरू आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, स्थिरस्थावर झाले. सध्या त्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत या जागांचा लाभ घेतला जात आहे.
आता कारखान्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. परिसरात शिक्षण संस्था, रहिवासी वसाहती वाढल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. कारखाना परिसरात हंगाम काळात वारंवार वाहतूक कोंडी होते. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाड्यांना रस्ते अपुरे पडत असल्याने लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत.
कारखाना प्रशासनाने भाडेकरूंशी चर्चा करून पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर केला. कारखान्याचे मार्गदर्शक व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सर्व भाडेकरूंनी कारखान्यास सहकार्य करावे, असे सार्वजनिक आवाहन केले. याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभेतही ठराव पारीत करण्यात आला. मात्र, काही भाडेकरूंनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ’सोमेश्वर’च्या संचालक मंडळाने खेद व्यक्त केला आहे.
कारखान्याच्या वाढत्या प्रकल्पांमुळे जागेची व रुंद रस्त्यांची निकड निर्माण झाली आहे. त्यातून भाडेकरूंनी पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करणे, ही वेळेची गरज असल्याचे कारखाना प्रशासनाचे मत आहे. भविष्यात वाहतूक अपघात झाले आणि जीवितहानी झाली, तर जबाबदार कोण? असा सवाल व्यवस्थापनाने उपस्थित केला. स्थापनेच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी निःस्वार्थ भावनेने जमीन दिली होती. आजही त्याच भावनेने सर्वांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत सोमेश्वर परिसरातील दुकान लाइन काढण्यासाठी सभासदांनी परवानगी दिली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्थानिकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. संचालक मंडळ हे स्थानिक व्यावसायिकांना सहकार्य करेल; मात्र त्यांनी दुकान लाइन काढून सहकार्य करावे.
पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना
जिल्हा न्यायालयाने 2010 साली व्यावसायिकांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतर कारखाना व्यवस्थापनासोबत चर्चा झाली होती. व्यवस्थापनाने लहान गाळ्यांमध्ये पुनर्वसन करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. सद्य:स्थितीतील किमान निम्मी जागा व्यवसायासाठी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. परंतु, या मागणीला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
नितीन कुलकर्णी आणि महेश सत्तेगिरी, स्थानिक व्यावसायिक