

नारायणगाव : जिल्हा परिषद व जुन्नर पंचायत समिती आरक्षण सोडत सोमवारी (दि. 13) जाहीर झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ जागा आहेत. त्यातील सहा जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. तर पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी सात जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यात महिलांना संधी मिळणार आहे.(Latest Pune News)
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद आहे. शिवसेनेची फारशी ताकद नसली तरी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाची ताकद लक्षणीय आहे. त्यामानाने तालुक्यात भाजपाची ताकद कमी आहे.
राज्यात महायुती असली तरी जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या जाणार आहेत. काही पक्षांना या निवडणुकीत ओहोटी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढण्याची शक्यता आहे. तर दोन्ही शिवसेनेत पडझड होण्याची चिन्हे आहेत. दोन मात्तबर कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ जागा आहेत. त्यांचे आरक्षण पुढीलप्रमाणे - उदापूर -डिंगोरे गट- अनुसूचित जमाती महिला, ओतूर- धालेवाडी तर्फे हवेली- ओबीसी महिला, आळे- पिंपळवंडी गट- सर्वसाधारण, बेल्हे राजुरी गट- ओबीसी महिला, बोरी बुद्रुक- खोडद गट - ओबीसी महिला, नारायणगाव -वारूळवाडी गट - ओबीसी महिला, सावरगाव -कुसूर गट- सर्वसाधारण, बारव -तांबे गट - अनुसूचित जमाती महिला
पंचायत समितीच्या 16 जागा आहेत. त्याचे गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : उदापूर -अनुसूचित जमाती, डिंगोरे - सर्वसाधारण महिला, ओतूर -सर्वसाधारण, धालेवाडी तर्फे हवेली -सर्वसाधारण महिला, पिंपळवंडी -सर्वसाधारण, आळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, राजुरी -सर्वसाधारण, बेल्हे - नागरिकांचा मागास प्रवर्ग, बोरी बुद्रुक - सर्वसाधारण, खोडद -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नारायणगाव - अनुसूचित जाती महिला, वारुळवाडी - सर्वसाधारण महिला, सावरगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग, कुसूर - सर्वसाधारण, बारव - अनुसूचित जमाती महिला, तांबे - अनुसूचित जमाती महिला.