

Ambegaon Junnar Manchar Leopard Latest News
मंचर : दत्तात्रयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या नसबंदीबाबत जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी ही माहिती दिली.(Latest Pune News)
आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि परिसरात ऊस क्षेत्र वाढल्याने बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या जीवितासह पाळीव जनावरांचेही मोठे नुकसान होत असल्याने या समस्येवर ठोस तोडगा काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील आणि उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी ॲड. तेजस देशमुख यांच्या माध्यमातून ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
शासनामार्फत बिबट्यांची नसबंदी केल्यास हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यास आणि नागरिकांचा जीव वाचवण्यास मदत होईल, असा विश्वास कारखान्याकडून व्यक्त करण्यात आला.
बिबट्याच्या हल्ल्यांमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नसबंदी हा पर्याय विचारात घेतला असून याचिकेद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष भीमाशंकर साखर कारखाना
बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांचे हल्ले थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. जनहित याचिकेमुळे ठोस धोरण राबविण्यास मदत होईल.
प्रदीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, भीमाशंकर साखर कारखाना