

सोमेश्वरनगर: शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी सोमेश्वर कारखान्याची एफआरपी 3,285 रुपये प्रतिटन आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी 3,300 रुपये देण्याचे निश्चित केले आहे. 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळितास आलेल्या उसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये 29 नोव्हेंबरला वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. चालू गाळप हंगामात आतापर्यंत कारखान्याने 3 लाख 1 हजार टनांचे गाळप करत 3 लाख 14 हजार 950 साखरपोत्यांचे उत्पादन घेतल्याचे त्यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्णयानुसार गळितास आलेल्या उसाची किमान आधारभूत किंमत 14 दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बंधनकारक होते. त्यानुसार सुरुवातीच्या कालावधीमध्ये गळितास आलेल्या उसासाठी प्रथम हप्ता देणेबाबत उशिरा निर्णय झाल्यामुळे या कालावधीमधील रकमेवर 15 टक्क्यांप्रमाणे देय होणारी व्याजाची रक्कम 25 नोव्हेंबर रोजीच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे.
यामध्ये हंगाम 2021-2022 मधील 1 कोटी 10 लाख इतकी रक्कम जानेवारी 2023 मध्येच सभासदांचे खात्यावर वर्ग केलेली आहे. उर्वरीत हंगाम 2022-2023 मधील 23 लाख 90 हजार, हंगाम 2024-2025 मधील 40 लाख 68 हजार व हंगाम 2024-2025 मधील 64 लाख 58 हजार अशी एकूण 1 कोटी 29 लाख व्याजापोटीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 डिसेंबर रोजी वर्ग केली आहे. उशिरा दिलेल्या एफआरपीवरील व्याजाची रक्कम देणारा सोमेश्वर हा राज्यातील एकमेव कारखाना असेल.
कारखान्याने हंगाम 2021-2022 मध्ये एफआरपीपेक्षा प्रतिटन 218.37 प्रमाणे जादा 28 कोटी 94 लाख, हंगाम 2022-2023 मध्ये 499.51 प्रमाणे जादा 62 कोटी 77 लाख, हंगाम 2023-2024 मध्ये 697.02 प्रमाणे जादा 102 कोटी 11 लाख व हंगाम 2024-2025 मध्ये 226.94 प्रमाणे जादा 25 कोटी 23 लाख इतकी रक्कम दिली आहे.
सोमेश्वर कारखाना गेल्या 9 वर्षांपासून एफआरपीपेक्षा जादा दर देत असून, यावर्षीही जादा ऊसदराची परंपरा सोमेश्वर कारखाना कायम राखणार असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.