

भिगवण: उसाने भरलेला ट्रक आणि मोकळा ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू झाला. अमोल राजू कुराडे (रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापुर) असे होरपळून मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. हा अपघात भिगवण-बारामती राज्य मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत शनिवारी (दि. ६) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला. वाहनांच्या भीषण अपघात व ज्वालामुळे या मार्गावरची वाहतूक दोन तास खोळंबली होती. भिगवण पोलीस, अग्निशमन दल व नागरिकांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवले.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊसाने भरलेला ट्रक भिगवणकडून बारामतीकडे निघाला होता, तर मोकळा ऊसाचा ट्रॅक्टर हा भिगवणकडे निघाला होता. यावेळी पिंपळे हद्दीत या दोन्ही वाहनांची जोराची धडक झाली.
यामध्ये ट्रॅक्टरची डीझेल टाकी फुटल्याने आग लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. यामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात ट्रॅक्टर चालक अडकल्यामुळे बाहेर पडणे अशक्य झाले आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला. वाहनांच्या अग्नितांडावामुळे जवळपास दोन तास वाहतूक थांबली होती.
भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट घेवून मदत कार्याला सुरवात केली. आग नियंत्रणात आणण्यासाठी बिल्ट कंपनी आणि शेटफळगढे येथील बारामती अग्रो कारखान्याची अशी दोन अग्निशमन दल वाहने पाचारण करण्यात आली. अग्निशमन दल, पोलीस जवान आणि नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली गेली. त्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
बळींची मालिका सुरूच
दरम्यान ऊस चाहतुक हंगाम सुरू झाल्यापासून हा या भागातील चौथा बळी ठरला आहे. विशेषतः ट्रॅक्टर चालकांचा बेकदरपणा जास्त कारणीभूत ठरत आहे. मोकळे ट्रॅक्टर व ट्रॉली अति वेगाने धावताना इतर वाहनचालक व प्रवाश्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. एवढ्या बेभान व नियंत्रणाबाहेर वेगाने ट्रॅक्टर धावत असल्याने वेगावर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याने अपघाताला आमंत्रण ठरत आहे यावर उपाययोजना व कारवाई महत्वाची आहे; मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने नाहक जीव जात आहेत.