

नारायणगाव: जुन्नर शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ मांडला असून, अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. काहींनी शासकीय रुग्णालयात, तर काहींनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत. यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जुन्नर नगरपरिषदेने या मोकाट कुत्र्यांच्या तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जुन्नर शहरातील मध्यभागात असणाऱ्या कल्याण पेठेच्या परिसरात लहान मुले व नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर अनेक शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर काजळे व विनायक गोसावी यांनी या विषयावर आवाज उठवत नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. गेले अनेक दिवसांपासून मागणी करूनदेखील नगरपालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने श्वान पकडणारी गाडी पाठवून संबंधित दोन्ही श्वानांना पकडण्यात यश मिळविल्याने कल्याण पेठ परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला. परंतु, अद्यापदेखील परिसरामध्ये भटकी कुत्री आहेतच. या सगळ्या कुत्र्यांना पकडणे गरजेचे आहे. जुन्नर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर काजळे, विनायक गोसावी, दत्ता नजान, अशोक चौधरी, सौरभ वर्पे, पिंटू रणदिवे, विद्या पानसरे, सुरेंद्र गोसावी, प्रीतेश शेळके, गणेश चौधरी आदी नागरिक उपस्थित होते.
मी स्वतः वैद्यकीय सेवेत असून मला रात्री-अपरात्री घराबाहेर पडावे लागते. परंतु आता घराबाहेर पडायचीदेखील भीती वाटते.
वैष्णवी गोसावी, नर्स
जुन्नर शहरातील मोकाट श्वान पकडण्याची कारवाई सुरू आहे. जोपर्यंत मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील.
चरण कोल्हे, मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद
माझ्या सहा वर्षांच्या मुलीचाही श्वानाने चावा घेतला आहे. आता त्यांना घराबाहेर सोडायची भीती वाटत आहे.
शीतल उंडे, पालक