Karegaon Nirmala Navale: सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या रिल्स स्टार निर्मला नवले पराभूत; राष्ट्रवादीला मोठा धक्का
Nirmala Navale Karegaon ZP Result: शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. कारण कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांच्या विरोधात लढलेल्या भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी सुमारे 2,700 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
निर्मला नवले या गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होत्या. त्यांच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळत होते. प्रचाराच्या काळात त्यांच्या सभांनाही मोठी गर्दी जमायची. त्यामुळे त्या सहज जिंकतील, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी वेगळाच निर्णय घेतला.
सोशल मीडियावर लोकप्रिय
सोशल मीडियावर लोकप्रियता असली, तरी निवडणूक जिंकण्यासाठी जमिनीवरचं काम अधिक महत्त्वाचं ठरतं. मनीषा पाचंगे यांनी प्रचाराच्या काळात सातत्याने घराघरात भेटी दिल्या, स्थानिक प्रश्न ऐकून घेतले आणि मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांच्या या नियोजित आणि शांत प्रचाराचा फायदा अखेरीस निकालात दिसून आला.
दुसरीकडे, निर्मला नवले यांची ओळख प्रामुख्याने डिजिटल माध्यमांपुरती मर्यादित राहिली, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. सभांमधील गर्दी आणि सोशल मीडियावरील प्रतिसाद असूनही प्रत्यक्ष लोकांनी त्यांना मतदान केलं नाही.
उच्चशिक्षित सरपंच ते जिल्हा परिषद उमेदवार
निर्मला नवले या आयटी इंजिनिअर असून सरपंच झाल्यानंतर “उच्चशिक्षित सरपंच” म्हणून त्यांचं कौतुक केलं जात होतं. सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आलिशान गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या अधिक चर्चेत आल्या होत्या.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे कारेगाव ही राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची जागा मानली जात होती. मात्र भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी बाजी मारत राष्ट्रवादीला धक्का दिला.
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या निकालामुळे शिरूर तालुक्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांच्या मते, हा निकाल सोशल मीडियाच्या प्रभावापेक्षा मतदारांशी थेट नातं आणि स्थानिक पातळीवरील काम किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा अधोरेखित करतो.
जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या या पराभवामुळे निर्मला नवले यांचा राजकीय प्रवास कुठल्या दिशेने जाईल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

