

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील भागवतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी (दि. 16) शाळेतील जीर्ण व कालबाह्य वर्गखोल्यांमध्ये दोन मोठे साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तीव भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. मात्र, सुमारे सात दशकांपूर्वी बांधलेल्या केवळ दोन जुन्या व धोकादायक वर्गखोल्यांमध्ये संपूर्ण शाळेचे अध्यापन व कार्यालयीन कामकाज सुरू आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असतानाही अपुऱ्या व जीर्ण खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शासकीय नियमानुसार कालबाह्य व धोकादायक इमारती वापरण्यास मनाई असताना पर्यायी खोल्यांचा अभाव असल्याने केवळ किरकोळ डागडुजी करून वर्ग भरविले जात आहेत. दगडी बांधकाम ठिसूळ झाले असून, भिंतींना ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. या भगदाडांमधून साप, विंचू, सरडे यांचा वावर वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शिक्षकांनी वर्गखोल्यांचे दरवाजे उघडले असता दुसरी व चौथी इयत्तेच्या वर्गखोल्यांमध्ये दोन साप आढळून आले. तातडीने विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. सर्पमित्राला पाचारण करून दोन्ही सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
शाळेच्या मागील बाजूस वाढलेले गवत, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि जीर्ण इमारत, यामुळे शाळेचा परिसर अधिक धोकादायक बनत आहे. मात्र, याबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत. कालबाह्य वर्गखोल्या तातडीने पाडून नवीन इमारतींचे बांधकाम सुरू करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
शाळेच्या वर्गखोल्या 1950 सालच्या असून, त्याबाबतचे रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध आहे. धोकादायक खोल्या पाडून नवीन बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी वरिष्ठस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
खुडेजा शेख, मुख्याध्यापिका