

निमोणे : ‘तो तर एकदम ठणठणीत होता. पैसापाणी बाळगून होता. पण तीन-चार महिन्यांपासून जरा खंगल्यासारखा दिसत होता. रुग्णालयात असल्याचं कळलं होतं, पण आज तर तो गेला. हे सगळं अचानकच कसं झालं?’ त्यावर, ‘अचानक नाही हो, त्याला पिण्यासह इतर व्यसनं होती. उपचारात लिव्हर कॅन्सरचं निदान झालं. खूप खर्च केला, अगदी लिव्हर ट्रान्सप्लांटचीही तयारी होती. मात्र, त्याच्या शरीराने साथच सोडली.’
अलीकडे अशा आशयाचे संवाद गावोगावी ऐकू येऊ लागले आहेत. ग््राामीण भागातील वाढलेली विविध व्यसनाधिता युवा पिढीच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असल्याचे दिसून येते. अनेक तरुणांना यकृतासंबंधित आजार जडल्याची भयावह परस्थिती निर्माण झाली आहे. व्यसनामुळे 18 ते 50 वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूची बाब गावोगावी सामान्य होत आहे.
जीवनात थोडीफार स्थिरता आली की, बहुतांशी तरुणांची पावले या नशेच्या बाजाराकडे वळतात. आजच्या घडीला ग््राामीण भागामध्ये अपघात, आत्महत्या आणि नैसर्गिक मृत्यू या यापेक्षा यकृत खराब होऊन होणारे मृत्यूचे प्रमाण खूप मोठे आहे. पन्नाशीच्या आतल्या पुरुषांना यकृत आजाराने गाठले, यातील बहुतांश जण सामाजिक, आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात.
आता नशेची मर्यादा गावठी दारू, देशी-विदेशी मद्य यापुरतेच राहिली नाही. त्यात गांजा, चरस, अफू यापलीकडे एमडी ड्रग्सचा मोठा वापर होताना दिसतो. यातून अनेकांच्या व्यसनाला मर्यादा राहिल्या नाही. व्यसनाच्या पार्ट्या करणारे हे सगळ्या वर्गातील पाहायला मिळतात. आर्थिकदृष्ट्या कुमकवत असलेला कोणत्याही मार्गाने पैसा उभा करून नशा करताना दिसून येतात.
ड्रग्जसारखे नशेचे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. नशेच्या या विविध पदार्थांना जास्त मागणी असल्याने या बाजारातही भेसळ मोठ्या प्रमाणात आहे. या भेसळयुक्त दारू असो, की एमडी ड्रग्ज ही मानवी आरोग्याला अतिशय घातक ठरत असल्याचे वैद्यकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
आजच्या घडीला विविध प्रकारची नशा करणे याला समाजामध्ये एक वेगळीच प्रतिष्ठा मिळते. मागील पाच वर्षे एकूण मृत्यूच्या 18 टक्के मृत्यू हे फक्त यकृत आजारामुळे झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामध्ये भारतामध्ये 2 लाख 68 हजार 580 मृत्यू हे लिव्हर कॅन्सरमुळे झाले आहेत.