

वर्षा कांबळे
पिंपरी (पुणे) : महापालिकेने शहराच्या काही भागात, बाजारपेठा व इतर वर्दळीच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतागृहे बांधली; मात्र त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पर्यायाने, महिलांना तेथे जाणे नकोसे झाले होते. मात्र, आता शहरात स्मार्ट टॉयलेटमुळे महिलांची होणारी कुचंबणा थांबली आहे. पिंपरी- चिंचवड शहरात महिला स्वच्छतांगृहाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. महिलांसाठी महापालिकेने स्वच्छतागृहे उभारली आहेत;
मात्र त्यांची स्वच्छता व देखभाल दुरुस्ती करत नसल्याने महिलांना ही स्वच्छतागृहे वापरता येत नाहीत. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणार्या महिलांची गैरसोय होत आहे. प्रत्येक वेळी युरिन नियंत्रित केल्यामुळे युरिन इन्फेक्शनसारख्या आजारांना महिला बळी पडतात. शहरात अशा 26 ठिकाणी स्मार्ट सिटीतर्फे स्मार्ट टॉयलेट उभारण्यात येत आहेत. सध्या भक्ती – शक्ती आणि पिंपळे निलख या ठिकाणी असे स्मार्ट टॉयलेट बांधण्यात आले आहेत. बाकीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात महिलांची सोय होईल.
पिंपरी-चिंचवड शहरात लोणावळा शहरापासून प्रवासी कामानिमित्त येत असतात. यामध्ये नोकरदार महिला आणि शिकणार्या विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच एस. टी. महामंडळाचे प्रवासी थांबे आहेत. या ठिकाणी आंतरजिल्हा प्रवासी संख्या मोठी आहे. लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास केल्यानंतर महिलांना शहरात पाऊल टाकल्यानंतर स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. महापालिकेची स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने महिलांची कुचंबणा होत असे. मात्र, आता स्मार्ट टॉयलेट सुविधा झाल्याने महिलांची गैरसोय दूर होईल. रस्त्यावर ड्युटी करणार्या महिला, वाहतूक पोलिस, वॉर्डन यांनादेखील त्याचा उपयोग होत आहे.
सॅनिटरी पॅडची सोय, लहान मुलांचे डायपर बदलण्याची सुविधा, स्तनदा मातांना स्तनपान करण्याची सुविधा, वॉश बेसिन, चेजिंग रुम, मिरर डिस्प्ले सुविधा.
हे स्मार्ट टॉयलेट 'पे अॅण्ड यूज' आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. येथे आल्यानंतर पाच रुपयाचा कॉईन टाकल्यावर दरवाज्यावरील बटण दाबले की हिरवी लाईट लागल्यानंतर दरवाजा उघडतो. या स्वच्छतागृहातील दिवे आणि पाणी यांना सेन्सर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आत प्रवेश केला की, आपोआप वीजेचे दिवे आणि पंखा सुरू होतो. याठिकाणी सॅनिटरी पॅडदेखील उपलब्ध आहे. तसेच लहान मुलांचे डायपर बदलण्यासाठी आणि त्यांना स्तनपान करण्याचीदेखील सुविधा आहे. तसेच टॉयलेटमध्ये फ्लशदेखील स्वयंचलित आहे. त्यामुळे संसर्ग होण्याची भीती नाही.
आम्हाला लोणावळ्यातून शहरात आल्यानंतर कुठे फिरायचे झाल्यास वॉशरूमचा प्रश्न होता. पण स्मार्ट टॉयलेटमुळे आमची गैरसोय दूर झाली आहे.
– प्रतीक्षा वायकर, विद्यार्थिनी
पूर्वी आम्हाला शहरात आल्यानंतर नाईलाजास्तव अस्वच्छ टॉयलेटमध्ये जावे लागत असे; परंतु आता स्मार्ट टॉयलेटमध्ये सुविधा असल्याने घराबाहेर पडल्यानंतर चिंता राहत नाही.
-प्रमिला ननवरे,
महिला व्यावसायिक
हेही वाचा