

काटेवाडी: एकेकाळी प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा ’श्रीगणेशा’ पाटी, पेन्सिलने होत असे. कोरी पाटी, बाराखडीचा सराव, त्यातून येणारी एकाग््राता... या सर्व प्रक्रियेमुळे मुलांची अक्षरओळख अधिक भक्कम व्हायची. परंतु तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढत्या वापरामुळे चिमुकल्यांच्या हातातील पाटी, पेन्सिल आता दुर्मिळ होत चालली आहेत.
गेल्या पाच-सहा वर्षांत मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरून शिक्षण घेण्याचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढले. कोरोनाकाळात तर ग््राामीण आणि शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाची सवय पक्की झाली. त्यामुळे आता पहिलीत प्रवेश करणारी अनेक मुलेही पहिले धडे गिरवत आहेत ते थेट मोबाईलच्या स्क्रीनवरून, असे काही शिक्षकांचे निरीक्षण आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांमध्ये चीडचिडेपणा, रागीटपणा, एकटेपणा आणि झोपेचा अभाव वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. घरातील पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला असून, स्क्रीनटाईम वाढल्याचा स्पष्ट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर होत आहे.
ग््राामीण भागात ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासाची पद्धत बदलली असली तरी नेटवर्कचा तुटवडा अजूनही मोठी समस्या आहे. यामुळे अभ्यासातील सातत्य आणि गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे मुख्याध्यापक अजित गावडे यांनी सांगितले. कीपॅडवर टायपिंग करणाऱ्या मुलांचे लेखनकौशल्य कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पालक सागर खराडे म्हणाले, ’शाळांमध्ये प्रोजेक्टर, संगणक, कीपॅड यांसारखी नवी साधने उपलब्ध झाल्याने पाटी, पेन्सिलचे लेखन मागे पडले आहे. डिजिटल साधने उपयुक्त असली तरी पारंपरिक लेखन सराव कधीही दुर्लक्षित होता कामा नये.’ शिक्षक तज्ज्ञांचे मत आहे की, तंत्रज्ञान आणि पारंपरिक पद्धती यामध्ये संतुलन राखणे ही काळाची मागणी आहे.
मोबाईलचा अतिरेक - धोक्याची घंटा
लहान मुलांना शांत करण्यासाठी किंवा जेवताना पालक अनेकदा मोबाईल देतात. यामुळे मुलांमध्ये अनावश्यक खाण्याची सवय, स्क्रीनवर अवलंबित्व, चीडचिडेपणा, आक्रमकता यांसारखे दुष्परिणाम दिसतात. स्क्रीनचा तीव प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट किरणे यामुळे नेत्रविकार आणि मानसिक त्रास उद्भवू शकतो. ’आपणच मुलांना मोबाईलची सवय लावतो आणि नंतर तिचे दुष्परिणाम पाहून घाबरतो. मुलांना आभासी दुनियेपासून बाहेर काढून वास्तवाशी जोडणे ही पालकांचीच जबाबदारी आहे. डिजिटल युगात ’डिजिटल डिटॉक्स’ अत्यावश्यक आहे,’ असे काटेवाडी (भवानीनगर) येथील डॉ. राकेश मेहता यांनी सांगितले.