पुणे : पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली खरी, पण या कारवाईत मोठा गोलमाल करून दिशाभूल केली जात असल्याचे समोर आले आहे. कारवाई करताना होर्डिंग पाडण्याऐवजी केवळ ते फलक काढण्यात आले असून, होर्डिंगचे सांगाडे मात्र जागेवरच आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर पुणे महापालिकेने धोकादायक होर्डिंगवर कारवाईची मोहीम सुरू केली होती. यामध्ये धोकादायकसह अनधिकृत आणि परवाना असलेली नियमाबाहेर जाऊन लावलेले होर्डिंगवर मात्र कारवाई करून ते काढण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते.
त्यानुसार आकाशचिन्ह विभागाने कारवाई सुरू केली होती. पहिल्या टप्यात 165 होर्डिंगला नोटीस बजाविण्यात आली, तर 56 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. यासंदर्भात पुढारीने केलेल्या पाहणीत मात्र पालिकेची कारवाई म्हणजे दिशाभूल असल्याचे आढळून आले आहे. जे होर्डिंग अनधिकृत आणि धोकादायक आहेत त्यांना थेट जमीनदोस्त करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या सर्व होर्डिंगवर कारवाई करताना केवळ त्यावरील जाहिरातीचे फलक काढण्यात आले आहेत. मात्र, खर्या अर्थाने ज्या होर्डिंगमुळे जीवितहानी होण्याचा धोका आहे अशा सर्व होर्डिंगचे सांगाडे जागेवर आहेत. शहरातील अनेक चौकांत असे होर्डिंगचे धोकादायक सांगाडे पुणेकरांना पाहायला मिळत आहेत.
त्यामुळे ही कारवाई म्हणजे केवळ दिखावा असल्याचे स्पष्ट झाले असून, अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगला प्रशासनच वाचविण्याचे काम करत असल्याचे दिसून येते आहे. यासंदर्भात आकाशचिन्ह विभागाच्या अधिकार्यांशी विचारणा केली असता त्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना हे सांगाडे काढण्याबाबत सूचना केल्या जातील, असे सांगितले.
हेही वाचा