

पुणे: शहरातील सात स्मशानभूमीतील गॅस शवदाहिन्यांचे कामकाज अखंडित सुरू रहावे, यासाठी पुणे महापालिका पुढील वर्षभर एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करणार आहे. हडपसर, कात्रज, वानवडी, गंगानगर, वैकुंठ आणि मुंढवा परिसरातील स्मशानभूमींमधील गॅस शवदाहिन्यांसाठी ९९ लाख ७२ हजार ४४८ रुपये खर्चाच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, वैकुंठ स्मशानभूमीच्या विकासासाठीही प्रशासनाने तयारी सुरू केली असून, या कामांची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिकेच्या परिमंडळ चार आणि पाचमधील सात स्मशानभूमींमध्ये गॅस शवदाहिन्यांची सुविधा उपलब्ध आहे. या शवदाहिन्यांसाठी नियमित इंधन उपलब्ध असणे आवश्यक असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाने एलपीजी सिलिंडर खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली होती.
यासाठी ९९ लाख ९७ हजार ४४२ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी निविदा प्रसिद्ध केली. त्याला दोन पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. एलपीजी सिलिंडरचे दर केंद्र सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात. त्यामुळे निविदेतील निश्चित रकमेऐवजी प्रत्यक्ष सिलिंडर पुरवठा होत असलेल्या महिन्यातील लागू दरानुसार संबंधित पुरवठादाराला पैसे दिले जाणार आहेत.
परिणामी, बाजारातील दरांनुसार महापालिकेच्या प्रत्यक्ष खर्चात बदल होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात गॅस शवदाहिन्यांसाठी एलपीजी सिलिंडर खरेदीकरिता तीन कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी एक कोटी रुपये सात स्मशानभूमींतील शवदाहिन्यांच्या इंधनासाठी खर्च केले जाणार आहेत.
वैकुंठ स्मशानभूमीचा विकास होणार
वैकुंठ स्मशानभूमीतील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार शेडची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी काँक्रिटीकरण, स्वच्छतागृहांची सुधारणा आणि पाणीपुरवठ्याच्या सुविधांची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच, आंबेगाव स्मशानभूमीतील उर्वरित कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली.