पुणे : भारती विद्यापीठ परिसरात विद्यमानांमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड

पुणे : भारती विद्यापीठ परिसरात विद्यमानांमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड
Published on
Updated on

बाजीराव गायकवाड/रवी कोपनर

धनकवडी : महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत ज्या भागाने राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी साथ दिली असा चैतन्यनगर – भारती विद्यापीठ हा प्रभाग नव्याने अस्तित्वात आला आहे. राष्ट्रवादीच्याच विद्यमान तीन नगरसेवकांचा परिसर या प्रभागात एकत्र आल्याने या पक्षाचे पारडे जड आहे.

Ward 56
Ward 56

भाजपकडून विद्यमान एका नगरसेविकेसह दोन सक्षम उमेदवार देऊन राष्ट्रवादीपुढे तगडे आव्हान उभे करण्याची व्यूव्हरचना केली जात आहे. चैतन्यनगर-भारती विद्यापीठ या नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग 56 मध्ये जुन्या प्रभाग 39 व 40 चा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. या भागात राष्ट्रवादीचे गेल्या 15 वर्षांपासूनचे वर्चस्व आहे. आता नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग 56 मध्ये याच पक्षाचे प्राबल्य आहे. असे असले तरी देखील भाजपला मानणारा मोठा मतदार वर्ग या प्रभागात आहे. भोर, वेल्हा व पुरंदर तालुक्यातील नागरिकांची मोठी संख्या वास्तव्यास असून, नेहमीच वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले आहे.

राष्ट्रवादीसमोर बंडखोरी रोखण्याचे आव्हान

राष्ट्रवादीकडे विद्यमान नगरसेवकांसह प्रबळ व सक्षम इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान असणार आहे. विद्यमान नगरसेवक विशाल तांबे, युवराज बेलदरे, अश्विनी भागवत, स्वीकृत सदस्य युवराज रेणुसे, माजी नगरसेवक संतोष फरांदे, शंकर कडू इच्छुक आहेत. सगळेच इच्छुक मातब्बर असल्याने उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीची दमछाक होणार आहे.
भाजपाकडून विद्यमान नगरसेविका वर्षा तापकीर, शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे, माजी नगरसेविका मोहिनी देवकर, सचिन बदक निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. भाजपकडून गेल्या निवडणुकीत तुल्यबळ लढत दिलेल्या गणेश भिंताडे यांच्या आकस्मित निधनाने सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

मनसे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे हे देखील या प्रभागात सक्षम उमेदवार देण्याची तयारी करत आहेत. शिवसेनेकडून अनिल भोसले, नेहा कुलकर्णी, निकिता पवार हे इच्छुक आहेत. आम आदमी पार्टीकडून कृष्णा गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून दिलीप दोरगे, सुधीर राजमाने, डॉ. पल्लवी वामन इच्छुक आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास सेना आणि काँग्रेसच्या हाती काही पडणार का, याबाबत संभ्रम आहे.

प्रभागात या समस्या अजूनही कायम…

या प्रभागात उच्चभ्रू बंगलो सोसायट्या व मध्यमवर्गीय नागरिकांची लोकवस्ती आहे. प्रभागातील सद्य:स्थितीतील मूलभूत सुविधा व विकास प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवून मतदान करणारा सुशिक्षित वर्ग मोठा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, बहुउद्देशीय भवन, क्रीडा संकुल, शून्य कचरा प्रकल्प, कात्रज डेअरी प्रलंबित रस्ता, मनपा शाळा मैदान एकत्रीकरण, प्रस्तावित पंपिंग स्टेशन व पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता अशी बहुतांशी विकासकामे मार्गी लावण्यात विद्यमान नगरसेवकांना यश मिळाले आहे. मात्र, दत्तनगर भुयारी मार्ग ते त्रिमूर्ती चौक व धनकवडी भागांत वाहतूक कोंडी, हातगाडी पथारीवाले यांची अतिक्रमणे या समस्या प्रामुख्याने सुटलेल्या नाहीत.

अशी आहे प्रभागरचना

चैतन्यनगर, भारती विद्यापीठ, राऊत बाग, गुलाबनगर, मोहननगर, धनकवडी बस स्थानक, आंबेगाव शिव, श्रेयस गार्डन, मोरे बाग, सावंत विहार, वंडरसिटी, त्रिमूर्ती चौक, शनी मंदिर परिसर इत्यादी भाग मिळून प्रभाग 56 तयार झाला आहे.

  • लोकसंख्या – 56,327
  • अनुसूचित जाती-3742
  • अनुसूचित जमाती-441

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news