

पुणे: “पतीच्या निधनानंतर आयुष्य अक्षरशः कोलमडून गेले होते. दोन मुलांची जबाबदारी, घरखर्च आणि भविष्याची चिंता डोक्यावर होती. नोकरीही मिळत नव्हती. शेवटी हार न मानता कपडे विक्रीचा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला व्यवसायात तोटाच झाला. पण, मुलांसाठी पुन्हा उभी राहिले. कष्ट केले. आज माझी दोन्ही मुले उच्चशिक्षण घेत आहेत आणि व्यवसायही सुरू आहे. सिंगल मदर म्हणून स्त्री आनंदाने, स्वाभिमानाने आणि खंबीरपणे आयुष्य जगू शकते, हे समाजाने स्वीकारले पाहिजे,” अशा शब्दांत एकल माता असलेल्या अर्चना वाघमारे (नाव बदलले आहे) या आपल्या संघर्षाचा प्रवास सांगत होत्या.
अर्चना यांच्यासारख्या कित्येक महिला आज महाराष्ट्रात एकल माता (सिंगल मदर) म्हणून आयुष्य जगत आहेत. आई म्हणजे माया, आधार आणि त्यागाचे प्रतीक. पण या एकल मातांनी त्यापुढे जात कुटुंबाचा कणा बनण्याची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली आहे. राज्यात सध्या एकल मातांचे प्रमाण वाढत असून, 25 ते 50 वयोगटातील अनेक महिलांनी एकल माता म्हणून जगण्याचा मार्ग स्वीकारला आहे. रविवारी (दि. 11) साजऱ्या होणाऱ्या जागतिक मातृ दिनानिमित्त दै. ’पुढारी’ने याबाबत घेतलेल्या आढाव्यात मुंबई, पुणे, सातारा, सांगली, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यांसह राज्यातील ग््राामीण भागातही एकल मातांचे प्रमाण वाढत असल्याची बाब समोर आली.
घटस्फोट, पतीचे निधन, कौटुंबिक मतभेद किंवा आयुष्यातील कठीण प्रसंगांमुळे अनेक महिलांना एकट्याने आयुष्याचा गाडा ओढावा लागत आहे. पण त्या निर्भीडपणे आयुष्य जगत आहेत. स्वतःचा व्यवसाय करण्याचा मार्ग अनेक एकल मातांनी निवडला आहे. कपडे विक्रीचा व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, छायाचित्रण, ब्युटीपार्लर, घरगुती पदार्थ विक्री, ऑनलाइन व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत महिलांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनिता (नाव बदलले आहे) म्हणाल्या, “दिवसभर ऑफिसमध्ये काम आणि घरी आल्यानंतर मुलांची जबाबदारी. स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण, मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहिले की, पुन्हा जगण्याची ताकद मिळते.”
महिला व्यावसायिक संध्या आढाव-पाटील म्हणाल्या, पतीपासून स्वत:हून विभक्त झाल्यानंतर माझ्या मुलीची मी स्वत: जबाबदारी घेतली. त्यानंतर अनेकांचे टोमणेही ऐकावे लागले. पण, मी खचले नाही. कोणाच्याही मदतीशिवाय एकटीने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. अनेक अडचणीही आल्या. पण त्यातूनच जगण्याची नवी वाट सापडली. आज स्वत:च्या मेहनतीने एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय मी उभा केला आहे. माझी मुलगी वकिलीचे शिक्षण घेत आहे. सिंगल मदर म्हणून जगणे म्हणजे समाजाच्या प्रश्नांना, टोमण्यांना आणि संघर्षांना रोज सामोरे जाणे. पण जी स्त्री स्वतःला घडवते आणि मुलांसाठी खंबीरपणे उभी राहते, ती केवळ आई राहत नाही, तर समाजासाठी प्रेरणा बनते.
सपोर्ट ग््रुाप ठरताहेत मानसिक आधार
शहरात काही स्वयंसेवी संस्था आणि सपोर्ट ग््रुाप एकल मातांसाठी आधारवड ठरत आहेत. कायदेशीर सल्ला, समुपदेशन, रोजगाराच्या संधी, संवाद आणि मानसिक आधार देण्याचे काम या संस्था करत आहेत. वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर म्हणाल्या, आम्ही ‘अभया’ गटाच्या माध्यमातून एकल महिलांसाठी काम करत आहोत. अनेक महिला मोठ्या जिद्दीने मुलांची जबाबदारी पेलत आहेत. काहींनी स्वतःचे व्यवसायही उभे केले आहेत. या महिलांसाठी आम्ही विविध उपक्रम राबवत