

पुणे : सिंहगड रस्त्यावरील पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या नदीकाठ सुधार योजनेतील स्ट्रेच क्रमांक 6 या महत्त्वाच्या टप्प्यातील कामाला गती देण्यात येणार आहे. राजाराम पूल ते वारजे-शिवणे पुलापर्यंत मुठा नदीच्या दोन्ही काठांवर सुमारे 8.2 किलोमीटर लांबीच्या या कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली. मात्र, हा प्रकल्प सुरू होण्याआधीच तब्बल 150 कोटी रुपयांची वाढ झाली असून, 300 कोटींवरून आता 450 कोटी खर्च या प्रकल्पावर होणार आहे.(Latest Pune News)
पावसाळ्यात दरवर्षी मुठा नदीला येणाऱ्या पूरामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरातील सुमारे 800 मीटर काठावरील लोकवस्तीत पाणी शिरते. येथील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पूराचे पाणी जात असते. येथील क्लस्टर प्रकल्प अद्याप शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे या ठिकाणी पुराची परिस्थिती बदलण्यासाठी येथे नदी काठ सुधारच्या कामाला मंजूरी देण्यात आली. नदी काठ सुधार योजनेतील स्ट्रेच सहाच्या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. या कामाची निविदा लवकरच काढली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता गोजारे यांनी दिली.
गोजारे म्हणाले, राजाराम पूल ते हिंगणे दरम्यान नदीकाठी असलेल्या सखल भागातील इमारतींमध्ये पूराचे पाणी शिरते. विठ्ठलवाडी परिसरातील नाला नदीला मिळत असल्याने पुराचा फुगवटा वाढतो. त्यामुळे या नाल्याला सीमाभिंत बांधली जाणार असून, खोलगट भागातील पाणी वाहून नेण्यासाठी डक्ट्स उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पात पूरस्थिती रोखणे आणि नदीकाठ सुशोभीकरण अशी दुहेरी उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत.
300 कोटींपासून 450 कोटींपर्यंत वाढले खर्चाचे गणित प्रकल्पाच्या सुरुवातीस 300 कोटी रुपयांचा अंदाज होता; मात्र पूरस्थिती रोखण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त कामांमुळे एकूण खर्च सुमारे 450 कोटी रुपयांवर पोहचला आहे. निविदा प्रक्रियेच्या तयारीनंतर लवकरच कामास सुरुवात होणार आहे.
सिंहगड रस्ता परिसर पूरप्रवण असल्याने या भागातील कामांसाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे. या समितीत महापालिका, पाटबंधारे विभाग आणि सीडब्ल्यूपीआरएस (उथझठड) येथील वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील. ते पाऊस, पूरस्थिती आणि परिसराच्या भौगोलिक रचनेचा सखोल अभ्यास करून कामाचे आराखडे अंतिम करतील, अशी माहिती अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.
नदीकाठावर असलेल्या चार घाटांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच, उपलब्ध जागेनुसार दोन्ही काठांवर 12 मीटर रुंदीचा पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे.
सध्या नदी पात्रात 30 मीटर रुंदीचा चॅनल आहे. हा चॅनल 90 मीटरपर्यंत रुंद करण्याचे नियोजन आहे. या टप्प्यात राजाराम पूल ते वडगाव (हायवेवरील पूल) आणि खडकवासला धरणाच्या दिशेने दोन्ही बाजूंना सुमारे 4.1 कि.मी.पर्यंत विकासकामे होणार आहेत.
या सर्व कामाचे डिझाइन करताना गेल्या 100 वर्षांतील पूरस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. सर्वाधिक पूर पातळीपेक्षा एक मीटर अधिक उंचीवर टोरनॅडो बांधले जाणार आहेत. त्यामुळे नदीचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून, भविष्यात उद्भवणारा पुराचा धोका कमी होईल.
महापालिकेने नदी काठ सुधार योजनेचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संगम पूल ते बंडगार्डन व बंडगार्डन ते कल्याणीनगर दरम्यानच्या स्ट्रेचचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. ही कामे अंतिम टप्यात आली आहेत. या सोबतच रामनदी परिसरातील कामाच्या निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. आता राजाराम पूल ते वारजे-शिवणे पुलापर्यंत मुठा नदीच्या दोन्ही काठावर सुमारे 8.2 किलोमीटर लांबीच्या या कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.
दिनकर गोजारे, विभागप्रमुख प्रकल्प विभाग, महापालिका