

पुणे: आंध्रप्रदेसशाची किनारपट्टी जवळ असलेल्या नरसापूरजवळ बुधवारी पहाटे मोन्था चक्रीवादळ धडकले. यानंतर हळूहळू त्याची तीव्रता कमी होऊन, आधी वादळात आणि त्यानंतर कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. येत्या 24 तासात त्याची तीव्रता आणखी कमी होणार आहे. (Latest Pune News)
मोन्था चक्रीवादळ मछलीपटनम आणि कलिंगपटनम दरम्यान पहाटे धडकले. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किनारपट्टीवर आल्यावर वादळाचा जोर कमी होऊन, त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. आंध्र आणि ओडिशाला या चक्रीवादळाने झोडपल्यानंतर ताशी 15 किमी वेगाने उत्तर पश्चिमेकडे प्रवास करीत आधी तेलंगणा आणि छत्तीसगढ कडे जात आहे.याच्या प्रभावामुळे तेलंगणा राज्यात बुधवारी काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस नोंदविण्यात आला.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र कायम
पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. पुढील तासात त्याची स्थिती कायम राहणार आहे. या दोन्ही क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस कायम असून, बुधवारी मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस नोंदविण्यात आला. तसेच अनेक जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस पडला. राज्याच्या अनेक भागात पुढील दोन दिवस पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.गुरुवारी राज्याच्या बहुतांश भागात, तर शुक्रवारी मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे.