

भवानीनगर : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच राजकीय डावपेच करून विरोधी पॅनेलच्या ब वर्गाच्या उमेदवाराचा आपल्या पॅनेलला पाठिंबा घेऊन मोठी राजकीय खेळी केली. त्यामुळे विरोधी पॅनेलला मोठा हादरा बसला आहे.
श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेलच्या ब वर्गाच्या उमेदवाराने विरोधी पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेलच्या ब वर्गाचे उमेदवार सत्यजित भाऊसाहेब सपकळ यांनी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत श्री जय भवानी माता पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेलला निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच उमेदवाराकडून फटका बसला आहे.
या पॅनेलला २१ पैकी १६ जागांवर उमेदवार मिळाले होते. त्यामध्ये ब वर्गाचे उमेदवार सत्यजित भाऊसाहेब सपकळ यांनी विरोधी पॅनेलला पाठिंबा दिल्यामुळे आता श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेलकडे १५ उमेदवार राहिले आहेत. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी ब वर्गाच्या उमेदवाराचा पाठिंबा आपल्या श्री जय भवानी माता पॅनेलला घेऊन श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेलला खिंडार पाडले आहे. श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेलला अडचणीत आणण्यासाठी दत्तात्रय भरणे आणखी कोणता उमेदवार गळाला लावणार आहेत किंवा कोणती राजकीय खेळी खेळणार आहेत याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान याबाबत ब वर्गाचे उमेदवार सत्यजित सपकळ म्हणाले, श्री जय भवानी माता पॅनेलला आपण बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे.