Ashadhi Wari 2023 : मोरोपंतांच्या नगरीत तुकोबाराय विसावले; सोहळ्याचे दिमाखात स्वागत

Ashadhi Wari 2023 : मोरोपंतांच्या नगरीत तुकोबाराय विसावले; सोहळ्याचे दिमाखात स्वागत
Published on
Updated on

राजेंद्र गलांडे : 

पंढरीचा महिमा ।
देतां आणीक नाही उपमा ॥1॥
ऐसा ठाव नाही कोठें ।
देव उभाउभी भेटे ॥2॥
आहेत सकळ ।
तीथें काळें देती फळ ॥3॥
तुका म्हणे पेठ ।
भूवरी हे वैकुंठ ॥4॥

बारामती : श्री क्षेत्र देहू येथून पंढरीच्या ओढीने निघालेल्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे कविवर्य मोरोपंत, श्रीधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारामतीनगरीत रविवारी (दि. 18) रोजी मोठ्या दिमाखात स्वागत झाले. येथील शारदा प्रांगणात सायंकाळी सव्वासातला सोहळा मुक्कामी विसावला. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शहरभर फडफडणार्‍या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन झालेले वारकरी यामुळे अवघी बारामती विठूमय झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह सोहळ्याचे स्वागत करीत पालखी रथाचे सारथ्य केले.

बारामतीतील पाटस रस्त्यावरील देशमुख चौकात पालिकेकडून भव्य व्यासपीठ पालखी स्वागतासाठी उभारण्यात आले होते. येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, अपर पोलिस अधिकारी आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदींनी सोहळ्याचे स्वागत केले.

शनिवारचा उंडवडी येथील मुक्काम आटोपून रविवारी सकाळी पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. उंडवडीच्या पठारावर सोहळ्याने पहिला विसावा घेतला. तेथून बर्‍हाणपूर येथे सोहळा आला. संस्थानच्या निर्णयानुसार यंदा सोहळा बर्‍हाणपूर गावात गेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावरच मंडप उभारला होता. रांगोळ्यांच्या पायघड्यांनी सोहळ्याचे स्वागत झाले. भर दुपारी येथे भक्तिमय वातावरणात पंगती उठल्या. दुपारच्या विश्रांतीनंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला. मोरेवाडी येथील विसाव्यानंतर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास बारामतीच्या वेशीवर पाटस नाका येथे पोहोचला. वेशीवर बारामतीकरांनी जल्लोषी स्वागत केले.

देशमुख चौकातून मुख्य बाजारपेठेतून पालखी सोहळा मुक्कामाकडे निघाला. टाळ- मृदंगाच्या गजरात वारकर्‍यांनी ग्यानबा-तुकारामचा जयघोष केला. पेठेतून सोहळा जात असताना पुष्पवृष्टी करण्यात आली. नगर परिषदेसमोरील शारदा प्रांगणात सोहळा सायंकाळी उशिरा मुक्कामी विसावला. येथे समाजआरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पालखीच्या दर्शनासाठी पाटस रस्त्यापासून ते शारदा प्रांगणापर्यंत मोठी गर्दी उसळली होती. सोहळ्याच्या मुक्कामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शामियान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वारकर्‍यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने तयारी केली होती.

फकाटेवाडीत आज मेंढ्यांचे रिंगण
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील महत्त्वाचे मेंढ्यांचे रिंगण सोमवारी (दि. 19) रोजी रंगणार आहे. काटेवाडीत परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या अंथरूण सोहळ्याचे स्वागत केले जाते. दुपारी रिंगण पार पडल्यावर सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश करेल.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news