वडिलांनी कमावलं, मुलानं खुर्चीसाठी गमावलं! उद्धव ठाकरेंना बावनकुळे यांचा टोला | पुढारी

वडिलांनी कमावलं, मुलानं खुर्चीसाठी गमावलं! उद्धव ठाकरेंना बावनकुळे यांचा टोला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धवजी तुम्ही संपवून टाकला. वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी देणाऱ्या मोदीजी आणि अमित भाईंवर टीका करु नये. तुमच्या सरकारच्या काळातील १०० खोक्यांची वसुली अद्याप जनता विसरलेली नाही, हे ध्यानात घ्या असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

बावनकुळे यांनी आज (दि. १८) एक ट्विट देखीले केलेल आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, तुम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी स्थापन केलेली शिवसेना स्वतःच्या मुख्यमंत्रिपदासाठी उध्वस्त केली. तुमच्या नाकर्तेपणामुळे आजही लोक तुमचा पक्ष सोडून जात आहेत. तरीही आता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह यांच्या नावाने खडे फोडत आहात. मोदीजी आणि अमितभाईंवर टीका कशी काय  करु शकता? आमची बावनकुळं ही विचारांचे पाईक राहिलेले कुळं आहेत. तुमच्यासारखं खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारं हे कुळ नाही. याचा मला सार्थ अभिमान आहे. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, ही फडणवीस यांची नाही तर तुमची अवस्था आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Back to top button