पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोने खरेदीच्या बहाण्याने पेढीत आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून 19 लाख 18 हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केले. तिघांनी दागिने खरेदीचा बहाणा केला, तर इतर तिघांनी संधी मिळताच ड्रॉव्हरमधील दागिने लंपास केले. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सराफ व्यावसायिक राकेश गोपीलाल जैन (वय 44, रा. एअरपोर्ट रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी अकराच्या सुमारास घडली.
फिर्यादींची महावीर ज्वेलर्स नावाची सराफी पेढी येरवडा बाजार जैन मंदिराच्या समोर आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास जैन पेढीत आले होते. दरम्यान, अकराच्या सुमारास सहा व्यक्ती खरेदीच्या बहाण्याने पेढीत आल्या. त्यातील एकाने सोन्याची अंगठी, तर दुसर्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचे सांगितले. फिर्यादींनी दागिने आणि मूर्ती त्यांना दाखविली. त्याचवेळी इतर तिघा साथीदारांनी फिर्यादींचे लक्ष नसल्याची संधी साधून काउंटरच्या ड्रॉव्हरमधून 17 सोनसाखळी, मंगळसूत्र, सोन्याचे मनी, मंगळसूत्रातील वाटी, डुले, सोन्याच्या 9 अंगठ्या असे 19 लाख 18 हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केले. दुपारी तीन वाजता फिर्यादी दुकान बंद करून घरी जेवण्यासाठी गेले. मात्र, ते परत आल्यानंतर स्टॉकमधील दोन सोन्याचे पॅकेट जागेवर नसल्याचे दिसले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, चोरीचा हा प्रकार समोर आला. त्यानुसार जैन यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा