

पुणे/वारजे : पुढारी वृत्तसेवा : वारजे माळवाडी भागात शनिवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास भर दिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. दुचाकीवर आलेल्या तिघांनी दोन पिस्तुलांतून चार गोळ्या झाडल्या असून, एक गोळी त्याच्या कमरेला चाटून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुरज तात्याबा लंगर (वय 21, रा. वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपींविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंगर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास या भागातील जय भवानी चौकातील पाण्याच्या टाकीजवळून मित्रासोबत क्रिकेट खेळण्यासाठी निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरून आरोपी तेथे आले. त्यांनी दुचाकीवरून दोन चकरा मारल्या, त्यानंतर लंगर याला शिवीगाळ करीत दोन पिस्तुलांतून त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या कमरेला चाटून गेली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भर दिवसा झालेल्या गोळीबाराने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते.
गोळीबारानंतर आरोपींनी पळ काढला असून, गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या वर्षी 16 डिसेंबर 2022 रोजी वारजे येथील रामनगरमधील वेताळबुवा चौकात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रामनगर परिसरात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर रस्त्यात गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जातेच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गोळीबार झालेला तरुण सुरज लंगर आणि गोळीबार करणारे आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी निष्पन्न झाले असून, पोलिस शोध घेत आहेत.
– दत्ताराम बागवे, गुन्हे निरीक्षक, वारजे माळवाडी पोलिस ठाणे
हे ही वाचा :