धक्कादायक! अनैतिक संबंधात ठरला अडथळा; तरुणाचा असा केला शेवट..

file photo
file photo

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून चारचाकी गाडी अंगावर घालून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. १२) दुपारी येथील पुणे -नाशिक महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल समोर घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी महिलेसह दोन जणांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय ४५, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिजित सोनवणे (वय २८,, रा. डिंगोरे, ता. जुन्नर) व महिला जेबा इरफान फकीर (वय ३२, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर) यांना याप्रकरणी अटक केली आहे. मृत साबीर मोहंमद शफी ब्यापारी व जेबा इरफान फकीर हे दोघेही विवाहित असून जुन्नर येथे शेजारी राहण्यास आहेत. साबीर हा जेबा हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. जेबा ही कांदळी वसाहतीत एका कंपनीत कामास होती. नोकरी निमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये-जा करत असे. अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासा दरम्यान जेबा व अभिजित यांची ओळख झाली. या माध्यमातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

ही माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला होती. यावरून साबीर व अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता. रमजान सणासाठी गुरुवारी अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. या वेळी तू येथे का आलास असा जाब साबीर याने अभिजित याला विचारला. यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी सकाळी जेबा ही कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती. साबीर याने तिचा पाठलाग सुरु केला. याबाबतची माहिती जेबा हिने मोबाईल कॉल करून अभिजित सोनवणे याला दिली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा येथील पुणे-नाशिक महामार्गलगत असलेल्या अयोध्या हॉटेल येथे उभा होता. दरम्यान अभिजित याने साबीर याच्या अंगावर मोटार घालून त्याला चिरडले. या घटनेत साबीर याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान शुक्रवारी सायंकाळी मोठा मुस्लिम जनमुदाय नारायणगाव येथील पोलीस पोलीस ठाण्यात जमा झाला होता. आरोपीला अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी पिंपळवंडी येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेलाही ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून संगनमताने हा गुन्हा केला असल्याचे प्राथमिक तपासा निष्पन्न झाले. याबाबतचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करीत आहे.
या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news