न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर पार्किन्सन्सची लक्षणे काय? | पुढारी

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर पार्किन्सन्सची लक्षणे काय?

डॉ. पंकज अग्रवाल

पार्किन्सन्स रोग हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होणे) रोग आहे, जो प्रामुख्याने एखाद्याच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम करतो. जर एखाद्याला पार्किन्सन्सचा आजार असेल तर थरथरणे, स्नायूंमधील कडकपणा, चालणे आणि हालचाल करण्यास येणार्‍या अडचणी आणि असंतुलन यांसारखी लक्षणे दिसून येतात. ही एखाद्याच्या दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणून जीवनावरही परिणाम करतात. आणखी एक लक्षण म्हणजे हालचाल मंदावणे, ज्यामुळे हालचाल करण्यात अडचणी येतात, चालण्याचा वेग कमी होतो आणि शारीरिक हालचाल कमी होते. पार्किन्सन्सची समस्या तीव्र झाल्यास मेंदूवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होऊन, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे, नैराश्य, चिंता, झोपेसंबंधी तक्रारी आणि थकवा येऊ लागतो. रुग्णांनी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतला पाहिजे. लक्षणे समजल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

पुढे झुकलेली शारीरिक स्थिती, हावभाव नसलेला चेहरा, एकसुरी आणि अडखळत बोलणे, जेवण गिळण्याचा त्रास, चालताना कमी झालेली हात हलवण्याची क्रिया, थरथरत्या आणि अतिशय हळू हालचाली, स्नायूंमधील ताठरता आणि जवळ-जवळ व छोटी पावले टाकत चालणे, तोल सांभाळता न आल्यामुळे वेळोवेळी पडणे अशी काहीशी लक्षणे या रोगात सुरुवातीला आढळून येतात.

सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणांमध्ये थरथरणे आणि हालचाल करण्यात अडचणी येतात. यामध्ये प्रामुख्याने शरीराची एका बाजू प्रभावित होते. सुदैवाने, ही प्रारंभिक लक्षणे कमी करण्यात औषधे उपलब्ध आहेत. दुसर्‍या टप्प्यात एखाद्या व्यक्तीला थरथरणे, ताठरपणा आणि चेहर्‍यावरील असामान्य हावभाव दिसून येतात. एखाद्या व्यक्तीची पाठ आणि मान दुखू शकते. विशिष्ट लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन वेळीच उपचारांना सुरुवात करणे योग्य ठरते. रुग्णांना वैद्यकीय उपचार नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

Back to top button