

पुणे : पुढारी वृत्तसेवा
लग्नाच्या आमिषाने एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेवत जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेना उपनेत्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ बबनराव कुचिक (रा. येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या उपनेत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२२ दरम्यान घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुचिक यांनी फिर्यादीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला लग्नाचे प्रलोभन दाखवले. त्यानंतर फिर्यादीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून फिर्यादी गरोदर राहिल्या. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करुन, तसेच या बद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकीन, अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी तरुणीची तब्येत ठीक नसतानाही त्यांच्याकडून समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.