

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या ताफ्यात असलेल्या शिवनेरी गाड्या फक्त पुणे-मुंबई, पुणे-ठाणे, पुणे-दादर या मार्गावरच धावायच्या. आता त्या गाड्या राज्यातील विविध मार्गांवर धावणार असून, नुकतीच या बसची सेवा पुणे-नाशिकदरम्यान सुरू करण्यात आली. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
एसटीच्या ताफ्यातील दादर-पुणे मार्गावर असलेल्या व 8 वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या शिवनेरी (वॉल्व्हो) बस मुंबईसह अन्य मार्गावर चालविण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी नुकतीच परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने पहिली गाडी पुणे-नाशिकदरम्यान सुरू करण्यात आली आहे. या बसला 'जन शिवनेरी' असे नाव देण्यात आले असून, या बसचे प्रतिटप्पा प्रवासी भाडे 12 रुपये 95 पैसे इतके असणार आहे. त्याची प्रवासी भाडे आकारणी करताना प्रवासी भाड्याव्यतिरिक्त वस्तू व सेवा कर प्रतिप्रवासी 1 रुपया ज्यादा आकारला जाणार आहे, असे एसटी प्रशासनाने सांगितले.
पुणे-नाशिक मार्गावरील पहिली शिवनेरी सेवा एसटीने सुरू केली आहे. ही बस पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर आगारातून सुटणार आहे. त्याचे प्रवास भाडे 500 रुपये प्रतिप्रवासी असणार आहे. एसटीकडीलच सध्याच्या शिवशाही बसचे प्रवास भाडे 475 रुपये आहे.
हेही वाचा