खराडीतील पालिकेच्या त्या भूखंडाला बिल्डरचे टाळे | पुढारी

खराडीतील पालिकेच्या त्या भूखंडाला बिल्डरचे टाळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खराडी येथील महापालिकेच्या मालकीचा पाचशे कोटींची किंमत असलेल्या भूखंडाला बांधकाम व्यावसायिकाने थेट टाळे ठोकण्याचा प्रकार केला असतानाही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. केवळ बांधकाम व्यावसायिकाला बोलावून समज देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले आले. त्यामुळे प्रशासन नक्की कोणाच्या दबावाखाली आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. खराडी सर्व्हे न. 53 व 54 येथील 15 हजार 779 चौरस मीटरची अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे.

एक्झिबेशन सेंटरचे आरक्षण असलेला हा भूखंड एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने आरक्षणाच्या बदल्यात आरक्षणाची जागा या तत्त्वावर ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र, त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. राज्यातील एका बड्या सत्ताधारी नेत्याच्या दबावाखाली प्रक्रिया सुरू असली, तरी पालिका प्रशासनही त्याबाबत नकारात्मक आहे.

असे असतानाच गेल्या आठवड्यात या बांधकाम व्यावसायिकाने परस्परच या भूखंडावर ताबा मारण्याची कार्यवाही सुरू केली. या भूखंडावर लोखंडी पत्रे लावण्यात आले आहेत. महापालिकेची भिंत तोडून बांधकाम व्यावसायिकाने आरक्षित भूखंडाला स्वतंत्र भिंत बांधण्याचे काम केले आहे. यासंबंधीचे वृत्त दै. मपुढारीफने प्रकाशित केल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली.

शनिवारी पालिकेच्या भूमी जिंदगी विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी केली. त्यानंतर सोमवारी या बांधकाम व्यावसायिकाच्या काही प्रतिनिधींना पालिकेत बोलावून या भूखंडावर कोणत्याही प्रकार बांधकाम अथवा इतर कार्यवाही करू नये, अशी तोंडी समज दिली. तसेच याठिकाणी केवळ बांधकाम व्यावसायिक आणि पालिकेचा भूखंड यामध्ये असलेली सामाईक भिंतच बांधली असून, दुसरे कुठलेही अतिक्रमण केले नसल्याचा दावा भूमी जिंदगी विभागाकडून करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र हा दावा खोटा असल्याचे खराडी वेलफेअर रेसिडेन्शील असोसिएशनच्या अध्यक्षा प्रभा करपे यांनी समोर आणले आहे.

या भूखंडावर बांधकाम व्यावसायिकाने लोखंडी पत्रे मारले असून, लोखंडी गेट लावून त्यास थेट टाळेही ठोकले आहेत. त्यामुळे पालिकेने हे लोखंडी गेट आणि पत्रे लावणार्‍यांवर कारवाई का केली नाही आणि अतिक्रमण करून लावण्यात आलेले टाळे काढण्याची कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत भूमी जिंदगी विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

हेही वाचा

कर्नाटक राज्यात भाजपमध्ये निर्नायकी! अधिवेशन सुरू झाले तरी नेता ठरत नसल्याची काँग्रेसची टीका

अल्पवयीन मुलाच्या हातात आढळल्या 18 सुया; पुण्यात धक्कादायक प्रकार

पुणे : सणस मैदान अखेर खुले..! 15 दिवस पाच प्रशिक्षकांच्या ताब्यात देणार

Back to top button