बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप विरोधी पक्ष ठरलेला नाही. भाजपमध्ये विरोधी पक्ष नेत्यावरून गोंधळ माजला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधी पक्ष नेत्याविना पार पडला. यावरून सत्ताधारी काँग्रेसने भाजप नेत्यांवर शरसंधान करत सभागृहातील 66 आमदारांपैकी एकहीजण विरोधी पक्ष नेत्यांसाठी लायक नाही का, असा सवाल उपस्थित केला.
कायदा आणि व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांनी भाजपला छेडले. राज्याच्या इतिहाहात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्यांविना राज्यपालांनी अभिभाषण केले आहे. विरोधी पक्ष नेता निवडीबाबत भाजपचे वेगळे नियोजन असू शकते; परंतु सभागृहाची मर्यादा पाळण्यासाठी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता असणे आवश्यक असते.
भाजप सत्तेत असतानाही त्यांच्याकडून लोकशाहीच्या मूल्यांचे पालन केले जात नाही. आता विरोधी पक्षात असतानाही त्यांना आपली जबाबदारी पार पाडता येत नाही. भाजपला विरोधी पक्ष नेत्याबाबत विश्वास नाही, अशीही टीका करण्यात आली आहे.