कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रोड येथील इस्कॉन चौकातील आरएमडी शाळेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक साकारण्यात येणार आहे. त्याच्या चौथर्याचे भूमिपूजन रविवारी कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते पार पडले. स्मारकाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, तसेच छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास सांगणार्या पोवाड्याचे या वेळी सादरीकरण करण्यात आले. शिवनेरी किल्ल्यावरून आणलेल्या मातीच्या कलशाने हे भूमिपूजन करण्यात आले. भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या वतीने लोकसहभागातून हा पुतळा साकारण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर धर्म, मंदिर, देव नसते आणि आपणही हिंदूच नसतो. शिवराय हे दैवत असल्याचे मत या वेळी कालीचरण महाराजांनी व्यक्त केले. कालीचरण महाराजांनी शिवतांडव स्तोत्र व गोंधळ गीतांचे गायन केले. शिल्पकार अजिंक्य कुलकर्णी, वास्तुविशारद गिरीश कारंडे यांच्यासह गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड केलेल्या लहान स्केटिंग खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी आमदार योगेश टिळेकर, भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष भगवान टिळेकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, माजी नगरसेवक प्रकाश कदम, विरसेन जगताप आदींसह सर्वपक्षीय नेते आणि नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा