वडगावातील अभ्यासिकेची इमारत धूळ खात; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

वडगावातील अभ्यासिकेची इमारत धूळ खात; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या इमारतीचे दोन मजले बांधून पूर्ण झाले आहेत. मात्र, फर्निचरची कामे अद्यापही बाकी असल्याने ही इमारत वापराविना धूळखात पडली आहे. फर्निचरची कामे तातडीने पूर्ण करून ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

या इमारतीचे बांधकाम 2012 मध्ये सुरू करण्यात आले होते. तीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ही अभ्यासिका अद्यापही खुली न झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थी पंकज फुले म्हणाला, ‘परिसरात विविध शैक्षणिक संस्था असल्याने ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली होणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने बाकी असलेली कामे तातडीने पूर्ण करून ही अभ्यासिका सुरू करावी.’

माजी नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले, ‘महापालिकेच्या भवन विभागाने या अभ्यासिका फर्निचरसह इतर कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. फर्निचर झाले नाही, तर अभ्यासिका कशी होणार कशी? महापालिकेच्या भवन विभागाने या अभ्यासिकेचा अर्धवट ताबा मालमत्ता विभागाला दिला आहे. ही अभ्यासिका लवकरात लवकर सुरू न झाल्यास तीव— आंदोलन करण्यात येईल.’ समाजविकास विभागाचे अधिकारी नितिन उदास यांच्याकडून या अभ्यासिकेबाबत योग्य ती माहिती मिळू शकली नाही.

या अभ्यासिकेची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. भवन विभागाने या इमारातीचे हस्तांतरण मालमत्ता विभागाकडे केले आहे. पुढील कार्यवाही मालमत्ता विभागाकडून करण्यात येणार आहे. महापालिका ज्यांना ही इमारत भाडेतत्त्वावर चालविण्यास देणार आहे, त्या ठेकेदाराने फर्निचरचे काम करणे अपेक्षीत आहे.

-रामदास कडू, उपअभियंता,
भवन रचना विभाग, महापालिका

ही इमारत समाजविकास विभागाच्या ताब्यात आहे. मालमत्ता विभागाकडून या इमारतीचे हस्तांतर समाजविकास विभागाकडे करण्यात आले आहे.

-मुकुंद बर्वे, अधिकारी,
मालमत्ता विभाग, महापालिका

हेही वाचा

नगर : शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के अपघातात जखमी

स्वराज्याचे स्फूर्तिस्थान जिजाऊ माँसाहेब

 

Back to top button