

शंकर कवडे
पुणे: न्यायालयीन कामानिमित्त तासन्तास प्रतीक्षा करणाऱ्या पक्षकारांना विरंगुळा मिळावा आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेले शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील ‘पक्षकार वाचनालय’ सध्या पुस्तकांविना ओस पडले आहे. एकेकाळी पुस्तकांनी गजबजलेल्या रॅकमध्ये आता फक्त धूळ साचलेली दिसत असून, प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय परिसरातील नवीन व जुन्या इमारतींमध्ये छोटेखानी वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली होती. न्यायालयात अनेकदा सुनावणीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते.
काही पक्षकार तर सकाळपासूनच न्यायालयात हजर असतात. अशा वेळी वेळेचा सदुपयोग व्हावा, ताण कमी व्हावा आणि वाचनाची सवय वाढावी, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. कायद्यावरील पुस्तके, सामाजिक आणि राजकीय विषयांवरील ग््रांथ, प्रेरणादायी साहित्य, कादंबऱ्या, तसेच वर्तमानपत्रे यांचा त्यात समावेश होता. न्यायालयीन कामकाजासाठी येणारे पक्षकार, त्यांचे नातेवाईक, वकील आणि नागरिक या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत होते.
मात्र, कालांतराने पुस्तकांची संख्या कमी होत गेली आणि आता बहुतांश रॅक रिकामे पडले आहेत. विशेष म्हणजे, न्यायालय परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही पुस्तके गायब होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देखभाल आणि नियंत्रणाच्या अभावामुळे हा उपक्रम थंडावल्याचे बोलले जात आहे. परिणामी, स्वतंत्र आणि सुस्थितीत ग््रांथालय सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयात पक्षकारांसाठी सुरू करण्यात आलेले वाचनालय हा अत्यंत चांगला उपक्रम होता. मात्र, तो टिकवून ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे. न्यायालय आवारात छोटेखानी ग््रांथालय सुरू करून त्याठिकाणी कर्मचारी नेमल्यास पुस्तके योग्य पद्धतीने उपलब्ध राहतील आणि नागरिकांमध्ये वाचन संस्कृतीही वाढेल.
ॲड. संग््रााम जाधव
पक्षकारांसाठीचे वाचनालय पुन्हा सुरू करण्यासाठी पुणे बार असोसिएशनमार्फत प्रयत्न केले जातील. याखेरीज, वकील वर्गाकडून पक्षकार, नागरिकांसाठी स्वतंत्र वाचनालयाबाबत होत असलेल्या मागणीबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
ॲड. कांताराम नप्ते, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन