

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये बॅचलर ऑफ व्होकेशनल अर्थात बी. व्होकसह अन्य काही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षाच झाल्या नसल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रकाशित केले होते.
त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या पदवी व पदविका (डिप्लोमा) व 125 अंतर्गत पदविका अनुशेष परीक्षा उन्हाळी सत्र परीक्षा येत्या 14 ते 26 मे दरम्यान पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी दिले आहेत.
डॉ. तलवारे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सर्व डिप्लोमा 2018 पॅटर्न व 125 अंतर्गत पदविका अनुशेषित विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर दि. 14 ते 26 मे दरम्यान घेण्यात याव्यात.
या पूर्वीच्या शैक्षणिक वर्षातील सर्व बॅकलॉग परीक्षांचे महाविद्यालयीन स्तरावर आयोजन करण्यात यावे व प्रचलित नियमानुसार निकाल जाहीर करण्यात यावेत. या सर्व प्रथम वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या अनुशेषित विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजनदेखील दि. 14 ते 26 मे दरम्यान घेण्यात यावे.
शैक्षणिक वर्ष 2025-2026 विधी अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष 2023 पॅटर्न मधील सर्व परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेणार आहोत. याबाबत महाविद्यालयांचे, परिसंस्थांचे प्राचार्य, संचालकांनी संबंधित पत्रक संबंधित महाविद्यालयांचे, परिसंस्थांचे विद्यार्थी, शिक्षक व इतर घटकांच्या निदर्शनास आणून द्यावे.
डॉ. राजेंद्र तलवारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे