

पुणे: शहरातील आरएमसी प्लॅट बंद राहिल्यामुळे महापालिकेकडून सुरू असलेल्या पाच उड्डाणपुलांच्या कामांना त्याचा फटका सहन करावा लागला आहे. या पाच उड्डाणपुलांची कामे पूर्ण होऊन जून महिन्यात ते वाहतुकीसाठी सुरू होणार होते, आता मात्र ते लांबणीवर पडणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
शहरातील आरएमसी प्लांटमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घालून दिलेल्या नियमांची पूर्तता केली नसल्याने अनेक प्लांट बंद करण्यात आले. तर, त्यातच महापालिकेने काही प्लांटवर कारवाई करून ते जमीनदोस्त केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरएमसी प्लांटधारकांनी दि. 16 एप्रिलपासून सर्व आरएमसी प्लांट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
याचा थेट फटका महापालिकेच्या विकासकामांवर झाला आहे. प्रामुख्याने महापालिके कडून शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांचे नियोजन कोलमडले आहे. सद्य:स्थितीला सनसिटी व कर्वेनगरला जोडणाऱ्या मुठा नदीवरील सनसिटी पूल, कोरेगाव पार्क व कल्याणीनगरला जोडणाऱ्या मुळा-मुठा नदीवरील उड्डाणपूल, साधू वासवानी रेल्वे लाईनवरील उड्डाणपूल, घोरपडी रेल्वेलाईनवरील उड्डाणपूल आणि विश्रांतवाडी चौक येथील उड्डाणपूल यांची कामे जून महिन्यात पूर्ण करून पावसाळ्यापूर्वीच म्हणजेच जूनअखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून करण्यात आले होते. त्यानुसार ही कामे प्रगतिपथावर होती.
मात्र, शहरातील आरएमसी प्लांट सलग 23 बंद राहिल्याने या सर्व पुलांची कामे रखडली असून, जून महिन्यात कामे पूर्ण करून उड्डाणपूल सुरू करण्याचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर या उड्डाणपुलांच्या कामांना आणखी विलंब लागण्याची शक्यता असून, पुणेकरांना ऐन पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल.
शहरातील आरएमसी प्लांट सुरू झालेले आहेत, त्यामुळे ज्या उड्डाणपुलांची कामे रखडली होती, ती कामे आता रात्रीच्या वेळी कामे सुरू ठेवून वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. दिलेल्या मुदतीतच सर्व पुलांची कामे पूर्ण केली जातील.
संदीप पाटील, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग