पुणे : शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण सिंहगडावर साजरा

पुणे : शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण सिंहगडावर साजरा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'हर हर महादेव…' 'जय भवानी, जय शिवराय…' 'छत्रपती संभाजी महाराज की जय'चा जयघोष… शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर… भंडारा आणि फुलांची उधळण… भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी… अशा चैतन्यमय वातावरणात शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण सिंहगडावर साजरा झाला.

विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळा झाला. छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते.

सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज आकाश कंक, अनमोल कंक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, विश्व हिंदू परिषदचे संजय मुरदाळे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, सचिव श्रीकांत चिल्लाळ यांसह शिवभक्त उपस्थित होते.

'पूर्णाकृती पुतळे बसवावेत'

किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधिस्थळाची पडझड झालेली दिसली, त्यामुळे त्या स्थळाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यात यावी, तसेच किल्ले सिंहगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे पूर्णाकृती पुतळे बसविले जावेत, अशी मागणी किशोर चव्हाण यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news