राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघातून आजी-माजी खासदार आणि इच्छुक असलेले संभाव्य उमेदवार आजच्या घडामोडीने एकाच आघाडीत आले आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे अजित पवारांबरोबर भाजप-शिंदे सरकारमध्ये गेले आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यापूर्वीच या गोटात सामील झालेले आहेत;
तर ज्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवून जोरदार तयारी केली असे भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नजीकच्या काळात शिरूर लोकसभा मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्याच्या राजकारणात भूकंप होऊन भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अशी आघाडी अस्तित्वात आली आहे. या घडामोडींनी राज्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे उदयाला येणार आहेत.
गेल्या चार वर्षांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक दिग्गजांनी तयारी केली होती. अशा अनेकांच्या तयारीला सुरुंग लागला असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहापैकी पाच आमदार आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी विधानसभेची तयारी केली आहे, त्यांचे आता काय होणार? येणार्या निवडणुकीत विद्यमान म्हणजेच राष्ट्रवादीच्या आमदारांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहर्यावर तडजोडी होणार? याकडे त्या त्या मतदारसंघांतील जनतेचे लक्ष लागून राहील.
हेही वाचा