सोलापूर : दत्त, स्वामी समर्थ मंदिरांमध्ये आज गुरुपौर्णिमा उत्सव | पुढारी

सोलापूर : दत्त, स्वामी समर्थ मंदिरांमध्ये आज गुरुपौर्णिमा उत्सव

सोलापूर;पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर शहरात असलेल्या श्री दत्त व स्वामी समर्थ मंदिरांमध्ये सोमवारी 3 जुलै रोजी होणार्‍या गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून आतापासूनच दर्शनासाठी नियोजन करण्यात येत आहे.

शहरात दत्त चौकातील जुने दत्त मंदिर, पूर्व भाग, मड्डी वस्ती, नीलम नगर, सात रस्ता, जक्कल मळा, अक्कलकोट रस्त्यावरील हेरिटेज, अवंतीनगर येथील दत्त मंदिरासह गेंट्याल टॉकीजच्या पाठीमागे अशोक चौक, जुळे सोलापूर, विजापूर रस्ता, शेळगीतील हवले, पार्क चौक, अवंती नगर, नाकोडा ग्रुप, कुंभारी-होटगी रस्ता, आसरा चौक, जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पहाटे काकड आरती, नामस्मरण, माळ जप, महाआरती, गुलाल, नैवेद्य, भजन, महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत. शेळगी येथील स्वामी समर्थ मंदिर, पूर्व भागातील दत्त मंदिरात रात्री भजनासह पालखी प्रदक्षिणा होणार आहे. जुनी पोलिस लाईन येथे सायंकाळी स्वरध्यास संगीत विद्यालयाचा भक्तिसंगीत व अभंगवाणी कार्यक्रम होणार असल्याचे संस्थापक गोरखनाथ डोंगरे, अध्यक्ष प्रमोद डोंगरे, जगदीश स्वामी यांनी सांगितले.

शेळगी येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नामस्मरणाबरोबरच माळ जपवर भर देण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद वाटप करून पालखी प्रदक्षिणा होणार आहे.
– अनिल हवले
संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ मंदिर, शेळगी

Back to top button