सोनई : पुढारी वृत्तसेवा : ट्रक चालक, क्लीनर व त्यांच्या साथीदारांनी लंपास केलेले 14 लाख 38 हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप व 15 लाखांचा ट्रक सोनई पोलिसांनी हस्तगत केला असून या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. सोनई पोलिस ठाण्यात शरद सुधाकर टेकवडे (रा. जवळा, ता. पुरंदर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली होती. ट्रकचालक अर्जुन सोमनाथ सोनवणे व क्लीनर नवनाथ साळवे (दोघे (रा. यशवंतनगर, सोनई, ता. नेवासा) यांनी रायपूर (छत्तीसगड) येथून ट्रकमध्ये 30 टन लोखंडी पाईप भरून ते पुणे येथे पोहोच न करता लंपास केले या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी व पथकाने चोरीस गेलेले काही पाईप वांजोळी येथे विक्री केल्याची माहिती मिळवून आरोपी सतीश शिवाजी खंडागळे (वांजोळी ता. नेवासा) यास अटक केली व 38 हजार रुपये किमतीचे 590 किलो पाईप हस्तगत केले. बाकीचे लोखंडी पाईप नितीन विलास शिरसाठ (लोहगाव, ता.नेवासा) याच्यामार्फत राजेंद्र मुंदडा (लासूर स्टेशन, ता. गंगापूर) यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. राजेंद्र मुंदडा यांच्याकडून सुमारे 24 असे एकूण 14 लाख 38 हजार रुपये किमतीचे पाईप हस्तगत केले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार एम. आडकित्ते, दत्ता गावडे, कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, निखील तमनर, महेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.