

पुणे : रेल्वेत नोकरी लाविण्याच्या आमिषाने सहा लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाविरुद्द गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी प्रशांत श्यामलाल तलरेजा (वय ३५, सध्या रा. फ्लेमिंगो सोसायटी, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. तलरेजानगर, जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहेत. आरोपीशी त्यांची २०१८ मध्ये ओळख झाली होती.
महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरीचे आमिष आरोपीने दाखविले होते. महिलेकडून आरोपीने वेळोवेळी सहा लाख ९६ हजार रुपये घेतले. महिलेने नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.