

बारामती: राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची सध्या मोठी चर्चा सुरू असतानाच इतर पक्षांचेही आमदार-खासदार फुटणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आमचा एकही खासदार फुटणार नाही, असे स्पष्ट केले.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना खा. पवार म्हणाले की, खासदारफुटीच्या चर्चेला काही अर्थ नसून आमचा एकही खासदार फुटणार नाही. राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत; पण या आमच्याकडील खासदार फुटणार नाहीत, असे म्हणत त्यांनी या प्रश्नावर पडदा टाकला.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहा खासदार फुटल्याने राज्यात वेगवेगळ्या ऑपरेशन्सच्या चर्चांनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असे म्हणत अजून काही लोक येणार असल्याचे सूतोवाच केले होते.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील आमदार-खासदार फुटतील, अशी चर्चा सुरू आहे. परंतु, खा. पवार यांनी बारामतीत यावर भाष्य करीत खासदार फुटणार नसल्याचे स्पष्ट केले.